पुणेरी पलटण संघाची हरियाणाला जोरदार धडक

पुणेरी पलटण संघाची हरियाणाला जोरदार धडक

सोनीपत - पुणेरी पलटणने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हरियाणा स्टीलर्सला प्रतिकाराची फारशी संधी न देता सहज बाजी मारली. पुण्याने ही लढत ३८-२२ अशी सहज जिंकत गटात चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारली. त्यामुळे हरियाणाचे अ गटात अव्वल क्रमांक मिळविण्याचे स्वप्न भंगले.

दीपक हुडाच्या आक्रमणाने हरियाणाची दाणादाण उडवली. त्याला प्रामुख्याने बचावात चमक दाखवणाऱ्या संदीप नरवालच्या उपयुक्त चढायांची साथ लाभली. त्यातच पुण्याने वेगाने प्रो कबड्डीत प्रगती करीत असलेल्या प्रशांत कुमार रायला चढाईत गुण मिळवण्यापासून रोखले, तर वझीर सिंग तीनच गुण मिळवू शकला. तिथेच त्यांनी अर्धी बाजी जिंकली. दीपकने एकंदर तेरा गुण घेतले, तर संदीपने तीन पकडींना पाच चढाईंच्या गुणाची साथ दिली. हरियाणाचा केवळ दीपक कुमार दहीयाच प्रतिकार करीत होता. त्याने ११ गुण नोंदवले. 

पुण्याने विश्रांतीस असलेली १९-८ आघाडी निर्णायक ठरणार असल्याचे ३१-१९ आघाडीने स्पष्ट केले. संदीप नरवालच्या समावेशामुळे पुणे पकडीत ताकदवान समजले जातात, हरियाणाने त्यांना पकडीत ८-८ असे रोखले, पण पुण्याने हरियाणाची ताकद असलेल्या चढाईतच २२-१४ अशी एकतर्फी हुकमत राखली, तसेच दोन लोणही दिले. यामुळे आघाडीच्या पाच संघांत सर्वात कमी सामने खेळलेल्या पुण्याने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. हरियाणाचे १४ लढतीनंतर ४६ गुण आहेत, तर पुण्याचे दहा सामन्यांत ३७. मुंबईचे पुण्यापेक्षा दोन गुण जास्त आहेत, पण मुंबई पुण्यापेक्षा तीन सामने जास्त खेळले आहेत. घरच्या कोर्टवरील लढती सुरू होण्यापूर्वीच पुणे जोषात आले आहे.

तमिळची ‘सुपर रेड’
कर्णधार अजय ठाकूरने अगदी अखेरच्या क्षणात दाखवलेल्या समयसूचकतेमुळे तमीळ थलैवाजला यू. पी. योद्धाजवर अखेरच्या क्षणी ३४-३३ असा विजय मिळविता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com