प्रो-कबड्डीत पंचांचीच पंचाईत

प्रो-कबड्डीत पंचांचीच पंचाईत

लखनौ - जवळपास प्रत्येक चढाईला घडणारी ॲक्‍शन, ती टिपण्यासाठी रोखलेले १४ कॅमेरे, श्‍वास रोखून धरणारे क्षण अशा वेळी खेळाडूंचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे, पण यामुळे पंचांचीच पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी यूपी योद्धा आणि जयपूर पिंक पॅंथर यांच्यातील सामना हेच स्पष्ट करत होता.

अखेरच्या क्षणी जयपूरने यूपीचा दोन गुणांनी पराभव केला, पण सामन्यातील थरारापेक्षा पंचांनी अखेरच्या क्षणी केलेल्या चुकांचीच चर्चा कबड्डी वर्तुळात अधिक होती. गत स्पर्धेत पंचांकडून अशा कही चुका निदर्शनास आल्या होत्या.

कोणत्याही स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम असला तरी काही खेळांमध्ये सामना संपल्यानंतर निर्णयाविरुद्ध तक्रार दाखल करण्याची संधी असते, प्रो-कबड्डीत मात्र अशी संधी नाही. सामना सुरू होण्याअगोदर पंचांचा निर्णय अंतिम राहील, असे पंचांकडूनच सांगण्यात येत असते, परंतु हेच पंच जेव्हा अटीतटीच्या क्षणी गोंधळलेले असतात. त्यावेळी त्याचा फटका संघांना बसू शकतो.

लखनौ येथील टप्प्यात पहिल्या दिवशी बंगळूर संघाला आणि रविवारी यूपी योद्धाला याचा फटका बसला. सामन्यानंतर बंगळूरचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी आम्ही पंचांच्या निर्णयाविरुद्ध मतप्रदर्शन करणार नाही, त्यांचे निर्णय आम्ही मान्य करतो, असे सांगितले होते; तर रविवारी यूपीचा कर्णधार नितीन तोमरने शेवटी तीही माणसे आहेत, चुका होऊ शकतात, असे मतप्रदर्शन केले होते.

रविवारच्या सामन्यात अंतिम क्षणी यूपीकडे आघाडी होती; पण एका सुपर टॅकलमध्ये जयपूरच्या जसवीरची पकड झाली, तरी त्याची जर्सी ओढली म्हणून यूपीच्या खेळाडूलाच बाद करण्यात आले. खरे तर पकड करताना त्याच्या हातात जर्सी आली होती. त्यानंतर जसवीरचा पाय लॉबीला लागला, त्यानंतर त्याची पकड झाली तरी बोथ आऊटचा निर्णय देण्यात आला. पंचांची पंचाईत एवढ्यावरच थांबली नाही, तर एका सुपर टॅकलमध्ये जसवीरने मध्यरेषेला केवळ स्पर्श केला होता. पकड निष्फळ ठरवण्यासाठी नियमानुसार मध्य रेषा किमान अडीच सें.मी. क्रॉस करणे आवश्‍यक असते. अशा काही प्रसंगांमुळे मैदानावरील पंचांवर दडपण येत असल्याचे दिसून येत असल्यामुळे भविष्यात मैदानावरील पंचांना दूरचित्रवाणी पंचांची मदत घेण्याची सवलत देण्यात यावी अशी सूचना केली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com