जडेजाची अष्टपैलू ‘एक’ नंबरी कामगिरी

पीटीआय
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - गैरवर्तनामुळे भले एका कसोटी सामन्याच्या बंदीची शिक्षा करण्यात आली असली, तरी रवींद्र जडेजाच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारी क्रमवारी आयसीसीने जाहीर केली. आपल्या प्रभावी डावखुऱ्या फिरकीमुळे कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होताच; पण फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे तो आता अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही पहिल्या स्थानी आला.

बांगलादेशचा शकीब अल हसन हा कालपर्यंत अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. आता हे स्थान जडेजाने मिळवले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली. कोलंबोत दोन दिवसांपूर्वी संपलेल्या कसोटी सामन्यात जडेजाने नाबाद ७० धावा आणि सात विकेट अशी कामगिरी केली. अष्टपैलू खेळांच्या यादीत भारतीय खेळाडूने पहिले स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ७० धावांमुळे जडेजाने फलंदाजीच्या क्रमवारीत नऊ गुणांची वाढ केली. त्यामुळे तो या क्रमवारीत ५१ व्या स्थानी आला आहे.

दरम्यान, कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीतून आर. अश्‍विनला दुसरे स्थान सोडावे लागले आहे. इंग्लंडचा जिम्मी अँडरसन दुसऱ्या स्थानी आला आहे. कोलंबोतील कसोटीत शतके करणाऱ्या चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही क्रमवारीत चांगली सुधारणा झाली आहे. पुजारा तिसऱ्या, तर रहाणे सहाव्या स्थानी आले आहेत. विराट कोहली पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

कसोटी क्रमवारी - (पहिले सहा)
फलंदाजी - १) स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया ९४१), २) ज्यो रूट (इंग्लंड ८९१), ३) चेतेश्‍वर पुजारा (भारत ८८८), ४) केन विलिमसन (न्यूझीलंड ८८०), ५) विराट कोहली (भारत ८१३), ६) अजिंक्‍य रहाणे (भारत ७७६).

गोलंदाजी - १) रवींद्र जडेजा (भारत ८९१), २) जिम्मी अँडरसन (इंग्लंड ८६०), ३) आर. अश्‍विन (भारत ८४२), ४) जोस हॅझलवूड (ऑस्ट्रेलिया ८२५), ५) रंगाना हेराथ (श्रीलंका ८१७), ६) कागिसो रबाडा (द. आफ्रिका ७८५).

अष्टपैलू - १) रवींद्र जडेजा (भारत ४३८), २) शकिब अल हसन (बांगलादेश ४३१), ३) आर. अश्‍विन (४१८), ४) मोईन अली (इंग्लंड ४०९), ५) बेन स्टोक्‍स (इंग्लंड ३६०).

Web Title: sports news ravindra jadeja