पप्पा, पण नदाल नंबर वन आहे ना...

पप्पा, पण नदाल नंबर वन आहे ना...

झ्युरीक - स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडरर याने यंदा रेकॉर्डब्रेक कामगिरी करीत अतुलनीय कारकिर्दीवर कळसाध्याय चढविला असला तरी मुलांकडून त्याची दांडी उडाली आहे. रॅफेल नदाल नंबर वनचा टेनिसपटू असताना तुम्हाला कसा काय पुरस्कार मिळणार, अशा आशयाची पृच्छा करीत त्याच्या मुलांनी टेनिसच्या इतिहासात ‘ऑल टाइम ग्रेट’ अशी नोंद झालेल्या आपल्या पित्याला गुगली टाकला.

स्वतः फेडररने ट्‌वीटरच्या माध्यमातून हा किस्सा कथन केला. त्याला ‘स्वित्झर्लंडचा सर्वोत्तम क्रीडापटू’ या पुरस्कारासाठी त्याला नामांकन देण्यात आले होते. त्याने सांगितले की, ‘मी घरी भोजन केले. त्या वेळी मुलांनी मला विचारले की, तुम्ही कुठे जाताय..त्यावर मी सांगितले की, एक कार्यक्रम आहे आणि त्यात मला पुरस्कार मिळण्याची शक्‍यता आहे. त्यावर मुलांनी त्याला विचारले की, पण नदाल नंबर वन आहे ना...?’

स्वतः फेडररने हा किस्सा ट्टीटरवर पोस्ट केला. तो दिवसभर व्हायरल झाला होता. या पुरस्कारासाठी क्रॉस कंट्री सायकलपटू निनो शुर्टर आणि अल्पाइन स्कीरेसर बीट फेयूझ हे शर्यतीत होते. फेडररला सर्वाधिक ३६.८८ टक्के मते मिळाली. 

फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून मोसमाची धडाक्‍यात सुरवात केली. विंबल्डनमध्येही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. यंदा त्याने नदालला चार वेळा हरविले. यातील तीन विजय त्याने अंतिम फेरीत नोंदविले. यानंतरही मोसमाअखेरच्या क्रमवारीत तो नदालला मागे टाकू शकला नाही. पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यामुळे फेडररची संधी हुकली. आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. नव्या मोसमात तो नदालला मागे टाकणार का, याची उत्सुकता असेल.

सातव्यांदा बहुमान
३६ वर्षीय फेडररला कारकिर्दीत सातव्यांदा हा बहुमान मिळाला. त्याने यंदा विक्रमी आठवे विंबल्डन विजेतेपद पटकावले. फेडररने म्हटले आहे, की ‘हा पुरस्कार म्हणजे फार मोठा सन्मान आहे. मी संपूर्ण टीमच्या वतीने तो स्वीकारतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा क्षण माझ्या वाट्याला आला नसता. त्यांच्याशिवाय मी कुणीही नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com