कंबोडियातील खडतर रॅलीत संजय उपविजेता

संजय टकले (उजवीकडे) नॅव्हिगेटर मिनील थान्याफात याच्या साथीत.
संजय टकले (उजवीकडे) नॅव्हिगेटर मिनील थान्याफात याच्या साथीत.

पुणे - पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने कंबोडियातील आव्हानात्मक खमेर रॅली रेडमध्ये खुल्या गटात दुसऱ्या क्रमांकासह उपविजेतेपदाचा करंडक जिंकला. आशिया क्रॉसकंट्री रॅलीत पाच वेळा जिंकलेल्या नाथ्थाफोन आंग्रीथानोन याने ही रॅली जिंकली. 

माजी आशिया क्रॉसकंट्री विजेता या नात्याने संजयला संयोजक कम्पुचिया ऑटोस्पोर्ट रेसिंग एजन्सीने खास आमंत्रण दिले होते. संजयने थायलंडच्या इसुझू कारटेक डेलो संघाची इसुझू डी-मॅक्‍स कार चालविली. थायलंडचा मिनील थान्याफात त्याचा नॅव्हिगेटर होता.

संजयने पहिल्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये एक मिनीट ३० सेकंद वेळ नोंदविली. विचावत चोतीरावी याच्या साथीत तो संयुक्त दुसरा होता. 
दुसऱ्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये संजयने कौशल्याच्या जोडीला सावधगिरी बाळगली. त्याने २८ मिनिटे १० सेकंदांत ही स्टेज पूर्ण केली. विचावतची वेळ २९.०९ सेकंद होती. संजयने त्यामुळे दुसरा क्रमांक गाठला.

ही स्टेज खडतर होती. २६ किलोमीटर ७७ मीटरच्या टप्प्यास गवत सुमारे १५ ते २० फूट उंचीचे होते. त्यातून मार्ग कसाबसा दिसत होता. त्याशिवाय मार्ग सपाट नव्हता. त्यामुळे संजयची कार भरकटली, पण सुदैवाने त्यांना पुढील टप्पा लगेच मिळाला. त्यात सुमारे ५० ते ५५ सेकंद वाया जाऊनही संजयने संयम ढळू दिला नाही. 

तिसऱ्या स्टेजमध्ये वेगळेच अडथळे होते. त्यात पाणथळ जागा, खड्डे होते. ४४ किलोमीटर ८७ मीटरच्या या स्टेजमध्ये संजयसमोर नाथ्थाफोनचे आव्हान होते. नाथ्थाफोन ट्रकचेसुद्धा टेस्टिंग करतो. तसेच त्याला क्रॉसकंट्रीचा बराच अनुभव आहे. अशावेळी संजयने खडतर स्टेजमध्ये धोका न पत्करता दुसरा क्रमांक कायम राखण्यास प्राधान्य दिले. काही ठिकाणी तीव्र उतार होते. नाथ्थापोनच्या  इसुझू डी-मॅक्‍सला चार किंग्ज शॉकॲब्सॉर्बर्स होते. संजयच्या कारला थायलंडमध्ये बनविण्यात आलेले दोन सस्पेन्शन्स होते. संजयने सांगितले की, काही स्पर्धकांच्या टोयोटा लॅंडक्रुझरला ४६०० सीसी इंजिन होते. माझ्या इसुझुला ३००० सीसी इंजिन होते. त्यामुळे ही कामगिरी महत्त्वाची ठरली.

निकाल - १) नाथ्थाफोन आंग्रीथानोन-पीरापोंग सोमबुतवोंग (दोघे थायलंड-इसुझू डी-मॅक्‍स-एक तास सात मिनिटे ३५ सेकंद), २) संजय टकले-मिनील थान्याफात (भारत-थायलंड-इसुझू डीमॅक्‍स-१ः१४.५०), ३) पिट्टीफोन प्रोमचोटीकुल-प्रकोर्ब चावथाले (दोघे थायलंड-टोयोटा रिव्हो-१ः२२.३१).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com