वरिष्ठ गटातही संजीवनी जाधवला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नागपूर - आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या संजीवनी जाधवला महासंघाच्या स्पर्धेत वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक हुलकावणी देत होते. अखेर तिने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ही मालिका खंडित केली. 

नागपूर - आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नाशिकच्या संजीवनी जाधवला महासंघाच्या स्पर्धेत वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक हुलकावणी देत होते. अखेर तिने गुंटूर येथे संपलेल्या ५७ व्या राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून ही मालिका खंडित केली. 

विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीला तमिळनाडूच्या एल. सूर्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून फेडरेशन, आंतरराज्य स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागत होते. भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत संजीवनीने सूर्यावर मात करून ब्राँझपदक मिळविले.

मात्र, गुंटूर येथे पुन्हा पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत संजीवनीला सूर्यापाठोपाठ रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मंगळवारी सकाळी झालेल्या दहा हजार मीटर शर्यतीत सूर्याचा सहभाग नव्हता. त्यामुळे संजीवनीचा सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा झाला. तिने सुवर्णपदक जिंकताना ३५ मिनिटे २१.३३ सेकंद वेळ दिली. स्पर्धेत संजीवनी भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघाचे प्रतिनिधित्व करीत होती. आसामच्या फुलन पालला रौप्य आणि छत्तीसगडच्या डिम्पल सिंगला ब्राँझपदक मिळाले. 

पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला दहा हजार मीटर शर्यतीतही ब्राँझपदकावर (३० मि.३७.९४ सेकंद) समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्याच रणजीत पटेलने (नाशिक) रौप्यपदक जिंकले. उत्तराखंडचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 
 

सिद्धांतचा विक्रम
पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्स शर्यतीत महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगलियाने (मुंबई) १३.७६ सेकंदाचा नवीन स्पर्धा विक्रम करीत सुवर्णपदक पटकावले. त्याने सात वर्षापूर्वी पतियाळा येथे नोंदविलेला १३.८१ सेकंदाचा स्वतःचाच स्पर्धा विक्रम इतिहास जमा केला. महाराष्ट्राचा दुसरा धावपटू पारस पाटीलला सहावे स्थान मिळाले. केरळच्या मर्लिन जोसेफ (११.६५ सेकंद) आणि तामिळनाडूचा एलक्कीया दासन (१०.५६ सेकंद) यांनी शंभर मीटरची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. महाराष्ट्राच्या गौरांग आंब्रे (१०.७७ सेकंद) आणि चैत्राली गुजर (१२.२६ सेकंद) यांना चौथे स्थान मिळाले.