स्नूकरमध्येही ओएनजीसीचे वर्चस्व

पीवायसी हिंदू जिमखाना - आंतर-पेट्रोलियम सांघिक स्नूकर स्पर्धेतील "ओएनजीसी'' संघाला विजेतेपद मिळवून देणारे (डावीकडून) सौरभ कोठारी, पंकज अडवानी आणि मनोज कोठारी.
पीवायसी हिंदू जिमखाना - आंतर-पेट्रोलियम सांघिक स्नूकर स्पर्धेतील "ओएनजीसी'' संघाला विजेतेपद मिळवून देणारे (डावीकडून) सौरभ कोठारी, पंकज अडवानी आणि मनोज कोठारी.

पुणे - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) संघाने १४व्या आंतरपेट्रोलियम सांघिक स्नूकर स्पर्धेतही विजेतेपद मिळविले. बुधवारी सांघिक बिलियर्डसचे जेतेपद राखल्यानंतर अशीच कामगिरी करत ओएनजीसीने दुहेरी यश नोंदविले. ओएनजीसीने इंडियन ऑइलचे आव्हान ४-२ असे परतवून लावले.

सांघिक बिलियर्डसमध्ये अखेरचा सामना खेळलेल्या पंकजने या वेळी सुरवात केली. त्याने लक्ष्मण रावतविरुद्ध दोन्ही फ्रेम जिंकल्या. त्यानंतर सौरभ कोठारीने ब्रिजेश दमानीविरुद्ध पहिली फ्रेम जिंकल्यामुळे आघाडी ३-० अशी वाढली. ब्रिजेशने दुसरी फ्रेम जिंकत इंडियन ऑइलचे खाते उघडत पिछाडी कमी केली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी अनुभवी आलोक कुमार आणि इंडियन ऑइलचा प्रतिभासंपन्न आदित्य मेहता आमनेसामने आले.

अटीतटीने झालेली पहिली फ्रेम आदित्यने दहा गुणांच्या फरकाने जिंकली. त्यामुळे ३-२ असा स्कोअर झाला. अखेरच्या फ्रेममध्येही चुरस कायम राहिली. त्यात आलोकने ११ गुणांच्या फरकाने बाजी मारत ओएनजीसीचे विजेतेपद नक्की केले.

ओएनजीसीचे प्रशिक्षक मनोज कोठारी यांनी सांगितले, की पंकजने सुरवात दमदार केली. त्यानंतर सौरभने पहिली फ्रेम जिंकली. ३-० अशा आघाडीमुळे आमच्यावरील दडपण नष्ट झाले. त्यानंतर बरोबरी झाली तरी निर्णायक लढतीसाठी आम्ही पंकजला खेळवू शकलो असतो; पण आलोकने ती वेळ येऊ दिली नाही. तिन्ही खेळाडूंच्या प्रयत्नांमुळे हे सांघिक यश साकार झाले.

यजमान भारत पेट्रोलियमने तिसरा क्रमांक मिळविला. यात शिष्यवृत्तीप्राप्त श्रीकृष्णाने निर्णायक सामना जिंकला.

निकाल - अंतिम फेरी - ओएनजीसी विवि इंडियन ऑइल ४-२
पंकज अडवानी वि.वि. लक्ष्मण रावत २-० (५९-७, ५५-४३), सौरव कोठारी बरोबरी वि. ब्रिजेश दमानी १-१ (८९(६९)-१०, ११-५८), आलोक कुमार बरोबरी वि. आदित्य मेहता १-१ (६२-७२, ४९-३८)
तृतीय क्रमांक - बीपीसीएल वि.वि. जीएआयएल ४-२
इशप्रीत चड्डा बरोबरी वि. मनन चंद्रा १-१ (१३-९३, ६३-३९), आशुतोष पाधी बरोबरी वि. शाहबाज खान १-१(६४-३७, ३९-६५), एस. श्रीकृष्णा वि. अशोक कुमार २-० (८०-४, ६६-२).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com