रबाडा दोषी; पण कसोटीत खेळणार

रबाडा दोषी; पण कसोटीत खेळणार

डर्बन - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा सहकारी खेळाडूंचा मान ठेवत नाही. त्याची वागणूक योग्य नव्हती, असे सांगतानाच त्याने जाणूनबुजून ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव स्मिथला धक्का दिला नाही, असा निर्णय देण्यात आला.

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाबाबतचा निर्णय धक्कादायक आहे. त्याला स्मिथला धक्का बसल्याबद्दल; तसेच डेव्हिड वॉर्नरला मैदान सोडून जाण्यास सांगितल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले होते; पण आता त्याला तिसऱ्या कसोटीत खेळण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

रबाडाचे कृत्य आक्षेपार्ह होते; पण आयसीसीच्या जाणूनबुजून धक्का देण्याच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे त्याला त्याबाबत आपण दोषी समजत नाही, असा निर्णय देण्यात आला. रबाडाने आचारसंहितेचा पुन्हा भंग केल्यास आपल्यावर कठोर कारवाई होईल, याची रबाडासही जाणीव आहे, असेही निकालात म्हटले आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटीच्या वेळी रबाडाने स्टीव स्मिथला पायचीत केले. पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या स्मिथला रबाडाने खांद्याला धक्का दिला. सामनाधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध तीन दंड गुण दिले. त्याचे दंड गुण मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने त्याच्यावर दोन कसोटींची बंदी आली होती. 

रबाडाने या निर्णयाविरोधात दाद मागितल्यावर आयसीसीने आचारसंहिता अपील आयुक्त मायकेल हेरॉन यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. सहा तासांच्या सुनावणीनंतर रबाडाला केवळ सामना मानधनाच्या पंचवीस टक्के दंड आणि तीनऐवजी एकच दंड गुण देण्याचे ठरले. हेरॉन हे न्यूझीलंडचे आहेत; तसेच कसोटीचे सामनाधिकारी जेफ क्रो न्यूझीलंडचे आहेत. हेरॉन हे न्यूझीलंड रग्बीचे आयुक्त आहेत; त्याचबरोबर रग्बी जगतातील आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना या अव्वल संघातील लढतीच्या वेळी होणाऱ्या वादंगाचा निर्णय घेणाऱ्या समितीचेही सदस्य आहेत.

आयसीसी हा निर्णय स्वीकारत आहे. आम्ही त्याविरुद्ध दाद मागणार नाही. मात्र खेळाडूंनी विशेषतः नवोदितांनी आपल्या वर्तणुकीकडे लक्ष द्यावे, याची आठवण करून देत आहोत. क्रिकेटमध्ये खेळाडूंनी झोकून द्यावे, त्याच वेळी प्रतिस्पर्धी, सामनाधिकारी; तसेच नियमांचा सन्मान करणे अपेक्षित आहे. 
- डेव्ह रिचर्डसन,  आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

रबाडाची बाजू योग्य प्रकारे मांडलेल्या ॲडव्होकेट दाली पोफू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही आभारी आहोत. सामनाधिकाऱ्यांचा निर्णय बदलण्यात आम्हाला प्रथमच यश आले आहे. आता सर्वांचे लक्ष पुन्हा क्रिकेटवर केंद्रित होणे महत्त्वाचे आहे. 
- थबांग मॉरोए,  क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी प्रमुख

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कायम सर्वोत्तम आव्हानांचा सामना करायला तयार असतात. रबाडाविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत. आयसीसीच्या निर्णयाबाबत आम्हाला कोणताही आक्षेप नाही. रबाडा खेळणार हे गृहीत धरूनच आम्ही तयारी करीत होतो.
- नॅथन लिऑन, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com