सीरिंजवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

syringe
syringe

गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धा उंबरठ्यावर आलेली असताना भारतीय गोटात वेगळ्याच कारणामुळे खळबळ माजली.

भारतीय ॲथलिट राहत असलेल्या रूममध्ये सीरिंज सापडल्या आहेत, त्यामुळे चौकशी होणार असून, कोणत्याही क्षणी खेळाडूंची उत्तेजक चाचणी होण्याची शक्‍यता असल्याचे वृत्त येऊन थडकले; मात्र पथकाबरोबर प्रवास करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने याचा इन्कार केला. 

या सीरिंंज भारतीय खेळाडूंच्या रूममध्ये मिळाल्या नाहीत. आमची निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणाजवळ त्या मिळाल्या. त्या ठिकाणी इतरही देशांचे अनेक क्रीडापटू राहत आहेत. आमच्या पथकाबरोबर असलेल्या डॉक्टरांनी सीरिंज वैद्यकीय आयोगाकडे सोपविल्या.  त्यांनी त्या योग्य पद्धतीने नष्ट केल्या. त्यांच्याकडून कसलीही िवचारणा झाली नाही. त्यानंतरही आमच्याविषयी शंका घेतली जाणे अन्यायकारक आहे, असे हा पदाधिकारी म्हणाला.

राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यवाह डेव्हिड ग्रेव्हेमबर्ग यांनी मात्र सांगितले की, या सीरिंज क्रीडानगरीतील स्टाफने आणून दिल्या आणि याप्रकरणी चौकशी होईल.

अवैध उत्तेजकांना हद्दपार करण्याचे धोरण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) २०११ मध्ये राबविले. २०१४च्या ग्लासगोमधील राष्ट्रकुल स्पर्धेत ‘नो निडल पॉलिसी’ काटेकोरपणे अमलात आणली होती. फक्त वैद्यकीय उपचारांसाठीच सुयांचा वापर केला जाईल, असे ठरले होते.
ग्लासगोतील  स्पर्धेतही भारताच्या काही पॅरा ॲथलिट आणि कुस्तीपटूंच्या रूममध्ये सीरिंज मिळाल्या होत्या. चौकशीअंती भारतीय ॲथलिटना ‘क्‍लीन चिट’ देण्यात आली. तेव्हा केवळ इशारा देण्यात आला होता. त्या स्पर्धेत एकही भारतीय खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी सापडला नव्हता. भारताने १५ सुवर्णांसह ६४ पदके मिळवून पदक तक्‍त्यात पाचवा क्रमांक मिळवला होता.

खेळाडूंना सज्ञान केले आहे
गोल्ड कोस्टला रवाना होण्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडूंना उत्तेजकांबाबत सतर्क करण्यात आले आणि कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत, याचे ज्ञान देण्यात आले आहे. त्यामुळे आमचे खेळाडू कोणताही गैरप्रकार करणार नाहीत, असा विश्‍वास भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. रिकाम्या सीरिंज व्हिलेवाट लावण्यावरून २०१४ च्या स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धा फेडरेशनकडून अधिकृत इशारा देण्यात आला होता. तरीही रिओ ऑलिंपिकमध्येही रिकामी इंजेक्‍शन्स सापडली होती. उपचारासाठी जर सीरिंज आवश्‍यक असतील तर त्यासाठी परवानगी घेणे आवश्‍यक आहे, अन्यथा अडचणी वाढू शकतील, असेही आयओएकडून सांगण्यात आले.

२२५ खेळाडूंचे पथक
गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या यंदाच्या स्पर्धेत २२५ भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. बहुतांशी खेळाडू दाखल झाले असून, काही जण अजून विविध ठिकाणी सराव करत आहेत, त्यांच्या स्पर्धांच्या अगोदर ते दाखल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com