टेनिसपटू अंकिता रैनाचे मोसमातील तिसरे जेतेपद

मुकुंद पोतदार
रविवार, 13 ऑगस्ट 2017

पुणे - भारताच्या फेडरेशन करंडक संघातील टेनिसपटू अंकिता रैना हिने यंदाच्या मोसमात दुहेरीत तिसरे आयटीएफ विजेतेपद संपादन केले. बेल्जियममधील कोक्‍सीदे येथे क्‍ले कोर्टवर झालेल्या स्पर्धेत तिने नेदरलॅंड्‌सच्या बिबीयानी स्कूफ्स हिच्या साथीत ही कामगिरी केली.

पुणे - भारताच्या फेडरेशन करंडक संघातील टेनिसपटू अंकिता रैना हिने यंदाच्या मोसमात दुहेरीत तिसरे आयटीएफ विजेतेपद संपादन केले. बेल्जियममधील कोक्‍सीदे येथे क्‍ले कोर्टवर झालेल्या स्पर्धेत तिने नेदरलॅंड्‌सच्या बिबीयानी स्कूफ्स हिच्या साथीत ही कामगिरी केली.

एकेरीतील निराशाजनक पराभवानंतर अंकिताने ही कामगिरी केली. व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून संपर्क साधला असता, अंकिता म्हणाली की, उपांत्य व अंतिम फेरीत आम्ही पिछाडीवरून जिंकलो. एकेरीतील पराभव विसरून मी दुसऱ्या दिवशी कोर्टवर उतरले. दुहेरीतील संधीचा फायदा घेण्यावर मी लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांपूर्वी बिबीयानीसह मी याच स्पर्धेत खेळले होते. तेव्हा आम्ही उपांत्य फेरीत हरलो होतो. आम्ही दुसऱ्यांदाच एकत्र खेळत होतो. आम्ही दोघींनी कोर्टवरील परिस्थितीनुसार सूत्रे स्वीकारण्याकरिता पुढाकार घ्यायचे ठरविले. आमच्यात समन्वय चांगला होता, त्यामुळे आम्ही दोघी एकमेकींचे मत विचारात घेऊन डावपेच आखत होतो. दुहेरीत हेच महत्त्वाचे असते. बिबीयानीचा स्वभाव खेळकर आहे. ती कोर्टवर सतत हसतमुखाने वावरते. त्यामुळे मला खेळणे सोपे जाते.

या स्पर्धेपूर्वी अंकिताने प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक आठवडा स्पेनमध्ये क्‍ले कोर्टवर सराव केला. ही स्पर्धा क्‍ले कोर्टवरच झाली. त्यामुळे अंकिताला फायदा झाला. अंकिताचे हे दुहेरीत एकूण अकरावे विजेतेपद आहे. यंदा तिने याआधी सांता मार्घेरीटा डी पुला येथील स्पर्धेत नेदरलॅंड्‌सच्या इव्हा वॅकॅनोसह, तसेच हुआ हिनमधील स्पर्धेत एमिली वेबेली स्मिथ हिच्यासह जेतेपद मिळविले होते.

एकेरीत अंकिताला उपांत्यपूर्व फेरीत निराशाजनक पराभव पत्करावा लागला. ती २६९व्या क्रमांकावर आहे. तिला तिसरे मानांकन होते. ३२३व्या स्थानावरील युक्रेनच्या गॅना पोझ्नीखिरीन्को हिने तिला ४-६, ७-५, ६-२ असे हरविले.

निकाल - 
अंकिता - बिबीयानीची फेरीगणिक कामगिरी - पहिली - विवि लूना मीर्स-चेल्सी वॅनहुट्टे ६-४, ६-३. उपांत्यपूर्व - विवि व्हिन्सीयानी रेमी-मेरी टेमीन (फ्रान्स) ७-५, २-१ (माघार). उपांत्य - विवि अल्बीना खाबीबुलीना (उझबेकिस्तान)-अनास्ताशिया वॅसीलीएवा (युक्रेन) ४-६, ६-३, १०-७. अंतिम - विवि मेरी बेनॉईट-मॅगैल केम्पेन (बेल्जियम) ३-६, ६-३, ११-९.