राज्यात नव्या वर्षी दोन कुस्ती लीग

राज्यात नव्या वर्षी दोन कुस्ती लीग

पनवेल - महाराष्ट्रात कुस्तीची लोकप्रियता वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र चॅंपियन्स कुस्ती लीग; तसेच महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग या दोन्ही लीगना राज्य कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिली आहे. 

कुस्ती लीगच्या आयोजनाचा महाराष्ट्र कुस्तीला फायदाच होणार आहे. खेळाडू तसेच प्रशिक्षकांना आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही लीगना आम्ही मान्यता दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले. आम्ही दोन्ही लीगच्या प्रवर्तकांबरोबर चर्चा केली आहे.

त्यांच्यात कोणताही संघर्ष होणार नाही याकडे लक्ष दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही दोन्ही कुस्ती लीगच्या संयोजकांची भेट घेतली आहे. त्यांना दोन लीग होत असल्याची कल्पना दिली आहे. दोन्ही लीगचा कोणत्याही प्रकारे संघर्ष नको, असे सांगितले आहे. त्याचबरोबर एका लीगने आपला कार्यक्रम जाहीर केल्यावर त्यानुसारच दुसऱ्या लीगच्या तारखांना मंजुरी देण्यात येईल. दोन्ही लीगमध्ये किमान दीड-दोन महिन्यांचे अंतर असावे, हाही आमचा प्रयत्न असेल. आमचा कार्यक्रम लवकरच तयार होत आहे.

काही दिवसांतच याची अधिकृत घोषणा होईल आणि ही लीग मार्चच्या सुरवातीस होण्याची शक्‍यता आहे, असे प्रीमियर कुस्ती लीगचे वैभव लांडगे यांनी सांगितले. आमच्या लीगमधील चांगल्या कुस्तीगीरांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही परदेशी मार्गदर्शकांना निमंत्रित करण्याची योजना आहे, असे चॅंपियन्स लीगचे चंद्रशेखर शिंदे यांनी सांगितले.

स्वरूप चॅंपियन्स लीगचे
    या स्पर्धेत सहा संघ (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर).
    प्रत्येक सामन्यात सहा लढती, त्यात चार पुरुषांचे (५७, ६४, ७४ आणि ८४ किलोपेक्षा जास्त); तसेच दोन महिलांच्या (५२, ६० किलो)
    प्रत्येक वजनी गटासाठी तीन कुस्तीगीरांची निवड होणार
    प्रत्येक कुस्तीगीर किमान एक, तर जास्तीत जास्त तीन लढती खेळणार
    स्पर्धक केवळ राज्यातीलच कुस्तीगीर असणार
स्वरूप प्रीमियर लीगचे
    आठ संघांत एकंदर चुरस असणार
    आतापर्यंत मुंबईचा राजा, कोल्हापूरचा ढाण्या वाघ, किर्लोस्करवाडीचा कोब्राज, दख्खनचा काळा चित्ता, पुणेरी पॉवर हे संघ निश्‍चित
    अन्य संघांबाबतची चर्चा सुरू
    प्रत्येक संघात दोन परदेशी, दोन राष्ट्रीय कुस्तीगीरही असणार. एक सामना सात लढतींचा
    या सातपैकी दोन परदेशी, तर दोन राष्ट्रीय; तर उर्वरित तीन राज्यातील खेळाडू खेळणार
    सातपैकी दोन कुस्त्या मुलींच्या होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com