मुगुरुझा-व्हिनस अंतिम लढत

पीटीआय
शुक्रवार, 14 जुलै 2017

लंडन - स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने विंबल्डनच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने बिगरमानांकित मॅग्डलेना रिबॅरीकोवाची घोडदौड दोन गेमच्या मोबदल्यात खंडित केली.

लंडन - स्पेनच्या गार्बीन मुगुरुझाने विंबल्डनच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. तिने बिगरमानांकित मॅग्डलेना रिबॅरीकोवाची घोडदौड दोन गेमच्या मोबदल्यात खंडित केली.

मुगुरुझाने एक तास चार मिनिटांत सामना जिंकला. मॅग्डलेना बिगरमानांकित होती. सेंटर कोर्टवरील ही लढत एकतर्फी ठरली. मुगुरुझाने गेल्या वर्षी फ्रेंच विजेतेपद मिळविले होते. या लढतीपूर्वी तिने डाव्या मांडीला ‘स्ट्रॅपिंग’ केले होते, पण तिला दुखापतीचा कसलाही त्रास होत नसल्याचे जाणवले. तिने २५ मिनिटांत पहिले पाच गेम जिंकत पकड घेतली. मॅग्डलेना जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानावर असली तरी यंदा ग्रास कोर्टवर तिने १८ विजय आणि एकमेव पराभव अशी प्रभावी कामगिरी केली होती. २८ वर्षांच्या मॅग्डलेनाकडून अपेक्षा होत्या, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत प्रथमच उपांत्य सामना खेळताना तिला दडपणाला सामोरे जाता आले नाही.

मॅग्डलेनाने पहिला गेम जिंकून पिछाडी १-५ अशी कमी केली तेव्हा प्रेक्षकांना टाळ्या वाजवून तिला प्रोत्साहन दिले, पण या सेटमध्ये तिला सर्व्हिसवर केवळ दहा गुण जिंकता आले. मुगुरुझाने मारलेले परतीचे आक्रमक फटके प्रभावी ठरले. याशिवाय मुगुरुझाने नेटजवळ धाव घेत आक्रमण कायम ठेवले. दुसऱ्या सेटमध्ये मुगुरुझाने ताशी ७९ मैल वेगाने आलेल्या ‘सेकंड सर्व्ह’वर बॅकहॅंड विनर मारला. दुसऱ्या ब्रेकसह तिने ३-० अशी आघाडी घेतली. नंतर मॅग्डलेनाने झुंजार खेळ करीत सर्व्हिस राखली, पण या सेटमध्येही तिला आणखी भर घालता आली नाही.

व्हिनसची सरशी
मुगुरुझासमोर व्हिनस विल्यम्सचे आव्हान असेल. व्हिनसने ब्रिटनच्या योहाना काँटाच्या आशा संपुष्टात आणल्या. ३७ वर्षांची व्हिनस अंतिम फेरी गाठणारी १९९४ नंतर सर्वाधिक वयाची स्पर्धक ठरली. तेव्हा मार्टिना नवरातिलोवाने ही कामगिरी केली होती. व्हिनसने २००० मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. २००८ मध्ये तिने येथेच विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर तिला ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविता आलेले नाही. या वेळी तिला सर्वोत्तम संधी असेल.

निकाल (उपांत्य)
महिला एकेरी ः  गार्बीन मुगुरुझा (स्पेन १४) विवि मॅग्डलेना रिबॅरीकोवा (स्लोव्हाकिया) ६-१-, ६-१. व्हिनस विल्यम्स (अमेरिका १०) विवि योहाना काँटा (ब्रिटन ६) ६-४, ६-२.