सलग तिसऱ्या विजयासह सिंधू अव्वल

सलग तिसऱ्या विजयासह सिंधू अव्वल

दुबई - भारताच्या पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेतील आपल्या कामगिरीतील जबरदस्त सातत्य कायम राखताना शुक्रवारी सलग तिसऱ्या विजयासह गटात अव्वल स्थान पटकावले. गटातील अखेरच्या सामन्यात सिंधूने जपानच्या अव्वल मानांकित अकाने यामागुची हिचा २१-९, २१-१३ असा पराभव केला. 

सिंधूने यापूर्वी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे आजचा गटातील अखेरचा सामना हा केवळ गटातील स्थान निश्‍चितीसाठी महत्त्वाचा होता. सिंधूने सुरवातीपासून राखलेली आक्रमकता आणि यामागुचीचे फटक्‍यांवर नसलेले नियंत्रण हाच या निकालातील मुख्य फरक होता. स्पर्धेतील पहिला सामना सिंधूने चांगल्या सुरवातीनंतर कठीण केला होता. मात्र नंतर तिचा फॉर्म बघता प्रतिस्पर्धी तिला प्रतिकारच करू शकलेले नाहीत. 

सिंधूने आज यामागुचीविरुद्ध खेळताना सुरवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारले होते. वेगवान हालचालींबराबेर तिच्या ताकदवान फटके आणि स्मॅशेसने यामागुची सुरवातीपासून दडपणाखाली राहिली. यामागुचीचा एखाद दुसरा फटका सिंधूच्या अंगावर येत होता. पण बहुतेकदा तिचे फटके कोर्टबाहेरच गेले. फटक्‍यांवर नसलेल्या नियंत्रणामुळेच तिला सिंधूचा प्रतिकार करणे अशक्‍य झाले आणि सिंधूने पहिली गेम तेरा मिनिटांत जिंकली. दुसऱ्या गेमला ४-४ अशा बरोबरीनंतर सिंधूने दोन गुण मिळवून घेतलेली आघाडी गेमच्या मध्यापर्यंत कायम राखली होती. दुसऱ्या गेमध्ये तिसऱ्या गुणासाठी झालेली ३३ शॉट्‌सची रॅली वगळता सिंधूला आव्हान देण्यासारखा खेळ यामागुची दाखवूच शकली नाही. सिंधूने ११-८ अशा आघाडीनंतर यामागुचीला केवळ चार गुण मिळवून देत थाटात विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, श्रीकांतला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. चीनच्या शी युक्वीकडून तो १७-२१, २१-१९, १४-२१ असे हरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com