बाराव्या क्रमांकावरील पॉलीवर युकीची मात

बाराव्या क्रमांकावरील पॉलीवर युकीची मात

इंडियन वेल्स, कॅलिफोर्निया - भारताच्या युकी भांब्रीने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील घोडदौड कायम राखत तिसऱ्या फेरीत धडक मारली. त्याने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या ल्युकास पॉली याचे आव्हान दोन सेटमध्येच ६-४, ६-४ असे परतावून लावले. दोन्ही सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेक मिळवीत, युकीने आघाडी घेत दोन सेटमध्ये दमदार विजय मिळविला. युकीच्या कारकिर्दीमधील हा सर्वोत्तम विजय ठरला. ही एटीपी मास्टर्स १००० मालिकेतील स्पर्धा आहे.

युकी ११०व्या स्थानावर असून, त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली आहे. पॉलीला नववे मानांकन होते. युकीने एक तास १९ मिनिटांत सामना जिंकला. युकीसमोर यानंतर अमेरिकेच्या सॅम क्‍युरीचे आव्हान असेल. क्‍यूरी २१व्या स्थानावर आहे. त्याने मिशा झ्वेरेव याच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली.

प्रेक्षकांचे प्रोत्साहन
युकीला प्रेक्षकांचे चांगले प्रोत्साहन मिळाले. काही भारतीय पाठीराख्यांनी त्याचा खेळ ‘टॉप फिफ्टी’ दर्जाचा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पॉलीचा फोरहॅंड बाहेर गेल्यानंतर युकीने दोन्ही हात उंचावत जल्लोष केला. मग त्याने कोर्टचे ‘किस’ घेतले. त्या वेळी प्रेक्षक ‘युकी-युकी’ असा त्याच्या नावाचा जयघोष करीत होते.

दर्जेदार प्रतिस्पर्धी
पॉलीला नववे मानांकन होते. त्याने ‘ओपन १३’ आणि दुबई या स्पर्धांत अंतिम फेरी गाठली होती. 

आक्रमक खेळ
युकीने सुरवात आक्रमक केली. त्याने पहिल्याच गेममधील ब्रेकसह २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने पाचव्या गेममधील ब्रेकसह ४-१ अशी पकड भक्कम केली. पॉलीने ब्रेक मिळवीत २-४ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर दोघांनी सर्व्हिस राखल्या, पण एक ब्रेक युकीला पुरेसा ठरला. दुसऱ्या सेटमध्ये युकीने तिसऱ्या गेममधील ब्रेकसह ३-१ अशी आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये त्याची सर्व्हिस खंडित झाली. त्यामुळे ३-३ अशी बरोबरी झाली. अशा वेळी युकीने नवव्या गेममध्ये पुन्हा दमदार खेळ केला. पॉलीने तीन ब्रेकपॉइंट वाचविले, पण युकीने ब्रेकची संधी सोडली नाही. मग सर्व्हिस आरामात राखत त्याने विजय साकार केला.

दृष्टिक्षेपात
 युकीचा यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये २२व्या क्रमांकावरील फ्रान्सच्या गेल माँफिसवर विजय
 अमेरिकेतच ही कामगिरी. वॉशिंग्टनमधील सिटी ओपन स्पर्धेत ही कामगिरी
 क्रमवारीच्या निकषावर ही सर्वोत्तम कामगिरी
 २०१४च्या चेन्नई ओपनमध्ये युकीने १६व्या क्रमांकावरील इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनीला हरविले होते, पण तेव्हा फॉग्नीनीने तंदुरुस्तीअभावी माघार घेतली होती.
 युकीला पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळविल्याचे १६ गुण
 मुख्य स्पर्धेत तिसरी फेरी गाठल्याचे ४५ गुण
 युकीची या कामगिरीबद्दलची कमाई ४७ हजार १७० डॉलर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com