पुण्याची हरियानावर पुन्हा सरशी

शैलेश नागवेकर
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

रांची - मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या दोन तरबेज कोपरारक्षकांना पुन्हा एकदा विश्रांती देण्याचा निर्णय हरियाना स्टिलर्सच्या मुळावर आला. या संधीचा फायदा घेत पुणेरी पलटनने ३७-२५ असा विजय मिळवला आणि प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.

पुण्याचा हरियानावरील हा दुसरा विजय आहे. या पराभवानंतर हरियाना ‘अ’ गटात दुसऱ्या स्थानी कायम आहे; मात्र पुण्याने मुंबईला मागे टाकून तिसऱ्या स्थानी मजल मारली आहे. चढायांबरोबर पकडींमध्येही आज पुण्याचा खेळ सरस होता. पकडींमधले दोन्ही संघांतले १७-९; तर मोहित चिल्लर आणि नाडा यांना विश्रांती देणे हरियानाला महागडे ठरल्याचे स्पष्ट करणारे ठरले. दुसरीकडे पुण्याची संरक्षणाची बाजू संदीप नरवाल आणि गिरीश ईरनाक यांनी चोखपणे सांभाळली. हरियानाच्या सुरजित सिंगने चढायांनी नऊ गुण मिळवले; परंतु त्यांचा हुकमी वझीर सिंग अवघे तीनच गुण मिळवू शकला.थायलंडचा कर्णधार खोमसान थांगहाम याला उत्तरार्धात काही वेळासाठी पुण्याने संधी दिली होती.

प्रदीपचे द्विशतक
यंदाच्या मोसमात गुणांचा सपाटा लावणाऱ्या प्रदीर नरवालच्या आणखी एका सर्वोत्तम खेळीच्या जोरावर पाटणा पायरेट्‌स संघाने बंगळूर बुल्सचा ३६-३१ असा पराभव केला. प्रदीपने यंदाच्या मोसमातील १२व्या सामन्यातच गाठलेले गुणांचे द्विशतक हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. त्याने सलग १२ सामन्यात दहापेक्षा अधिक गुणांची नोंद केली. प्रदीपसह पाटणाकडून सातत्य राखणाऱ्या मोनू गोयतनेही सलग दुसऱ्यांदा ‘सुपर टेन’ कामगिरी केली; परंतु अखेरच्या क्षणी पाटणाने गुण गमावल्यामुळे त्यांना पाच गुणांनीच विजय मिळवता आला.