उत्तेजकांचा डाग कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

दोषी क्रीडापटूंत भारतावर तिसऱ्या क्रमांकाची नामुष्की
नवी दिल्ली - भारतीय क्रीडा क्षेत्रावरील उत्तेजकांचा डाग पुसला जाण्यास तयार नाही. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या अहवालानुसार 2015 मध्ये भारताचे 117 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते.

दोषी क्रीडापटूंत भारतावर तिसऱ्या क्रमांकाची नामुष्की
नवी दिल्ली - भारतीय क्रीडा क्षेत्रावरील उत्तेजकांचा डाग पुसला जाण्यास तयार नाही. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या अहवालानुसार 2015 मध्ये भारताचे 117 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले होते.

जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था सर्वंकष विचार करून अहवाल तयार करीत असते. भारत 2013 आणि 2014 मध्येही तिसराच होता. आताही रशिया (176) आणि इटली (129) यांच्यापाठोपाठ तिसरा आहे. दोषी ठरलेल्या सर्व भारतीय क्रीडापटूंच्या मूत्र नमुन्यात उत्तेजक आढळले आहेत.

हे दोषी क्रीडापटू 2015 मधील उत्तेजक चाचणीत सापडले होते; मात्र त्यानंतर त्याबाबत संबंधित क्रीडा महासंघाचे अहवाल आणि कारवाई यांची सर्वंकष माहिती 2017 च्या 31 जानेवारीपर्यंत घेण्यात आली आणि त्यानंतरच हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या तिसऱ्या क्रमांकापेक्षाही 117 दोषी क्रीडापटूंचा आकडा जास्त चिंताजनक आहे. 2013 मध्ये 91 आणि 2014 मध्ये 96 क्रीडापटू दोषी ठरले होते.
जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने क्रीडापटू अथवा सपोर्ट स्टाफने केलेल्या चुकांचाही अभ्यास केला आहे. दोषी 117 पैकी दोघांच्या चाचणीत बंदी घातलेले उत्तेजक आढळले नव्हते; पण तरीही ते दोषी ठरले आहेत. नियमानुसार चाचणी न देणे, उत्तेजक बाळगणे, ते कोणाला तरी देणे याबद्दल दोषी ठरले आहेत.

- एकंदर 115 क्रीडापटू चाचणीत दोषी, तर अन्य दोन नियमांचा भंग केल्याने दोषी
- 115 दोषी क्रीडापटूंत 78 पुरुष, तर 37 महिला
- सर्वाधिक दोषी क्रीडापटू वेटलिफ्टिंगमध्ये. 56 दोषी वेटलिफ्टरमध्ये 32 पुरुष आणि 24 महिला स्पर्धक
- 21 ऍथलिटस्‌ दोषी, त्यात 14 पुरुष आणि सात महिला
- बॉक्‍सिंग (8), कुस्ती (8), सायकलिंग (4), कबड्डी (4), जलतरण (3), पॉवरलिफ्टिंग (3), ज्यूदो (2), वुशू (2) क्रीडापटू; तसेच रोईंग, बॉडी बिल्डिंग, फुटबॉल, हॉकी, स्ट्रीट ऍण्ड बॉल हॉकीमधील एक.

मोठ्या प्रमाणावर तपासणी
- एकंदरीत 2 लाख 29 हजार 412 नमुन्यांची चाचणी
- यापैकी 2 हजार 522 नमुने संशयास्पद, तर अन्य नियमांचा भंग केल्याबद्दल 1 हजार 929 क्रीडापटू; तसेच 28 सपोर्ट स्टाफबाबत एडीआरव्हीनुसार (नियमांचे पालन न केल्याने) दोषी
- 1 हजार 649 एडीव्हीआर नमुने संशयाच्या जास्त भोवऱ्यात होते. त्यात 1304 पुरुष, तर 345 महिला क्रीडापटू

शरीरसौष्ठवमध्ये सर्वाधिक दोषी
जागतिक स्तरावर शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात सर्वाधिक 270 दोषी क्रीडापटू आढळले आहेत. त्या पाठोपाठ ऍथलेटिक्‍स (242) आणि वेटलिफ्टिंग (239) आहेत. सायकलिंग (200), पॉवरलिफ्टिंग (110), फुटबॉल (108), रग्बी युनियन (80), बॉक्‍सिंग (66), कुस्ती (57) आणि बास्केटबॉल (39) यातीलही लक्षणीय क्रीडापटूंनी उत्तेजकाचे सेवन केले आहे.

Web Title: Stimulating a permanent mark