स्वाती गाढवेची विजेतेपदाची हॅटट्रिक 

swati-gadhwe
swati-gadhwe

भिलाई - बहुधा कारकिर्दीतील शेवटची राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धा धावणाऱ्या रेल्वेच्या स्वाती गाढवेने भिलाई येथे रविवारी झालेल्या 51 व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत महिलांच्या दहा किलोमीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळवून वैयक्तिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत आंध्रच्या बी. स्रिनूने बाजी मारली. या स्पर्धेत प्रवेश अर्जात जन्मतारखेची नोंद नसल्याने महाराष्ट्राच्या 20 वर्षे मुले, मुली व 18 वर्षाखालील मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. महिला गटात सांघिक प्रकारात तिसरे स्थान ही महाराष्ट्रासाठी या स्पर्धेतील समाधानाची बाब. 

पुणे येथे मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या आणि स्पर्धेत भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारी स्वाती सुरवातीला रेल्वे, महाराष्ट्राची साईगीता नाईक, पश्‍चिम बंगालची पूजा मोंडल आणि मणिपूरची किरण सहदेव यांच्यासोबत एकत्र धावत होती. शर्यतीच्या मध्यावर तिने आघाडी घेण्यास सुरवात केली, त्या वेळी इतर धावपटूंकडून तिला आव्हान मिळू शकले नाही. या संधीचा फायदा घेत भास्कर भोसलेच्या नेतृत्वाखाली सराव करणाऱ्या स्वातीने आणखी वेग वाढविला व 37 मिनिटे 01.43 सेकंदांत सलग तिसऱ्या वर्षी शर्यत जिंकली. नऊ किलोमीटरपर्यंत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या महाराष्ट्राच्या साईगीता नाईकला शेवटी 37 मिनिटे 28.51 सेकंदांत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. नागपुरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत कार्यरत असलेली मोनिका राऊत सातव्या क्रमांकावर आली. पूजा मोंडलने रौप्य, तर किरण सहदेवने ब्रॉंझपदक जिंकले. रेल्वेने 16 गुणांसह अपेक्षितपणे सांघिक विजेतेपद मिळविले. पंजाबला 55 गुणांसह दुसरे, तर महाराष्ट्राला 59 गुणांसह तिसरे स्थान मिळाले. 

पुरुषांत रेल्वे आणि सेनादलाच्या खेळाडूंत चुरस होती. यात सेनादलाने बाजी मारली. दोन वर्षांपूर्वी दुसरे स्थान मिळविणाऱ्या स्रिनूने अंतिम क्षणी बाजी उलटवीत 31 मिनिटे 37.27 सेकंदांत सुवर्णपदक जिंकले. गतवर्षी सेनादल संघात असलेल्या कर्नाटकच्या ए. बी. बेलीअप्पाला दुसरे स्थान मिळाले. सेनादलाचा एम. एच. परसप्पा ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. यात सेनादलाने 18 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. रेल्वेला 34 गुणांसह दुसरे, तर पोलिस संघाला तिसरे स्थान मिळाले. महाराष्ट्र संघ 94 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला. 

मुला-मुलींच्या 20 वर्षे वयोगटात उत्तर प्रदेशच्या धावपटूंनी वर्चस्व गाजविले. मुलींच्या सहा किलोमीटर शर्यतीत हेमलता, तर मुलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत अनिलकुमार यादवने प्रथम क्रमांक पटकाविला. दोन्ही गटात सांघिक विजेतेपदही उत्तर प्रदेशनेच मिळविले. मुंबई मॅरेथॉन आणि आंतर विद्यापीठ स्पर्धेमुळे काही दिग्गज स्पर्धक राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com