भारताचा प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

चीनच्या क्विआओ बिनवर संघर्षपूर्ण विजय
बासेल (स्वित्झर्लंड) - भारताच्या गतविजेत्या एच. एस. प्रणॉय याने शुक्रवारी चीनच्या क्विआओ बिन याच्यावर संघर्षपूर्ण विजय मिळवून स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

चीनच्या क्विआओ बिनवर संघर्षपूर्ण विजय
बासेल (स्वित्झर्लंड) - भारताच्या गतविजेत्या एच. एस. प्रणॉय याने शुक्रवारी चीनच्या क्विआओ बिन याच्यावर संघर्षपूर्ण विजय मिळवून स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भारताचा पाचवा मानांकित प्रणॉयला आतापर्यंतच्या चार लढतीत बिनविरुद्ध केवळ एक विजय मिळविता आला आहे. या वेळी त्याने संयमी खेळ करून त्याचे आव्हान तीन गेमच्या संघर्षपूर्ण लढतीत 9-21, 23-21, 21-15 असे मोडून काढले. ही लढत 1 तास 12 मिनिटे चालली. बिनविरुद्ध प्रणॉयच्या क्षमतेची कसोटी लागली. पहिल्या गेममध्ये निष्प्रभ ठरलेल्या प्रणॉयने दुसरी गेम 15-18 अशा पिछाडीनंतर जिंकली. त्यानंतर निर्णायक गेममध्ये प्रणॉयने 8-5 अशी झकास सुरवात केली. प्रणॉयने पुढे ही आघाडी अखेरपर्यंत कायम टिकवून ठेवत विजय मिळविला.

प्रणॉयची गाठ आता चीनच्या द्वितीय मानांकित शी युकी याच्याशी पडणार आहे. त्याने स्वित्झर्लंडच्या आंद्रेस ऍन्टोन्सेन याचा 16-21, 21-15, 21-16 असा पराभव केला.

पुरुष एकेरीत भारताच्या शुंभकर डे याचे आव्हान संपुष्टात आले. तिसऱ्या फेरीत जपानच्या कांटा त्सुनेयामा याने शुभंकरचा 21-19, 21-14 असा पराभव केला.

मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या प्रणव चोप्रा-एन. सिक्की रेड्डी यांची गाठ चीनच्या पाचव्या मानांकित झॅंग नान-ली यिनहुई या जोडीशी पडणार आहे.

Web Title: swiss open badminton competition