बावुमाने बनविले वॉर्नरला मामा 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पर्थ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 539 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाला चार हादरे बसले. हुकमी सलामीवीर वॉर्नरला अशक्‍यप्राय चपळतेच्या जोरावर बावूमाने धावचीत केले. त्यानंतर रबाडाने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे कांगारूंचा पाठलाग बिघडला असून चौथ्या दिवसाअखेर त्यांची 4 बाद 169 अशी दुरवस्था झाली आहे. ऑस्ट्रेलियाला आणखी 370 धावांची गरज असून, त्यांच्या सहा विकेट बाकी आहेत. 

पर्थ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 539 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाला चार हादरे बसले. हुकमी सलामीवीर वॉर्नरला अशक्‍यप्राय चपळतेच्या जोरावर बावूमाने धावचीत केले. त्यानंतर रबाडाने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे कांगारूंचा पाठलाग बिघडला असून चौथ्या दिवसाअखेर त्यांची 4 बाद 169 अशी दुरवस्था झाली आहे. ऑस्ट्रेलियाला आणखी 370 धावांची गरज असून, त्यांच्या सहा विकेट बाकी आहेत. 

चौथ्या दिवशी आफ्रिकेने 6 बाद 390 वरून 8 बाद 540 धावसंख्येवर डाव घोषित केला. आफ्रिकेने आणखी दीडशे धावांची भर घातली. आज सुमारे तीन तास फलंदाजी करीत त्यांनी कांगारूंना आणखी बेजार केले. विशेष म्हणजे आफ्रिकेच्या क्विंटन-फिलॅंडर यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचत कांगारूंच्या गोलंदाजांचा अंत पाहिला. ही जोडी अखेर मिशेल मार्शने फोडली. मग पदार्पण करणाऱ्या महाराजनेसुद्धा नाबाद 41 धावा करीत कांगारूंच्या जखमेवर मीठ चोळले. क्विंटन व फिलॅंडरने प्रत्येकी दोन, तर महाराजने तीन षटकार खेचणे कांगारूंना धक्कादायक ठरले. अखेर स्मिथने स्वतःच्या हातात चेंडू घेतला व फिलॅंडरचा त्रिफळा उडविला. त्यानंतर आफ्रिकेने डाव घोषित केला. 

स्टेनच्या अनुपस्थितीत फिलॅंडर आणि रबाडा यांनी नव्या चेंडूवर मारा सुरू केला. ऑस्ट्रेलियाची सुरवात समाधानकारक झाली. त्यांना अर्धशतकी सलामी मिळाली होती. वॉर्नरचा जम बसला होता. त्याने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. 13व्या षटकात सहावा चौकार मारून त्याने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. पुढचाच चेंडू त्याने पॉइंटच्या दिशेने मारला आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावू लागला. छोट्या चणीच्या बावूमाने झेप टाकत चेंडू अडविला. हवेत असतानाच त्याने खाली असलेल्या उजव्या हाताने अचूक थ्रो केला. तोपर्यंत वॉर्नरला धावचीतचा कोणताही धोका जाणवत नव्हता आणि चेंडूकडे लक्ष न देता तो किंचित हळू धावत होता. त्याची पाठ असतानाच बावूमाचा थ्रो मधल्या स्टम्पच्या खालील भागात लागला. त्या वेळी वॉर्नरची बॅट क्रिझमध्ये नव्हती. थ्रो करताना बावूमा हवेतच होता. वॉर्नर धावचीत होताच बावूमाची चपळाई समालोचकांसह सर्वांनाच चकित करणारी ठरली. 

यानंतर 21 वर्षांच्या रबाडाने दुसरा सलामीवीर शॉन मार्श, प्रतिस्पर्धी कर्णधार स्मिथ आणि व्होजेस असे तीन मोहरे गारद केले. वॉर्नर बाद झाला त्याच षटकात शॉन परतला. ख्वाजा खाते उघडण्यापूर्वीच सुदैवी ठरला. ड्युमिनीच्या चेंडूवर त्याला पायचीत ठरविण्यात आले होते; पण "डीआरएस'मुळे तो बचावला. ख्वाजा-स्मिथ यांनी 92 धावांची भर घातली. स्मिथचा जम बसला होता; पण रबाडाच्या अप्रतिम आउटस्विंगवर तो चकला. पुढच्याच षटकात रबाडाने अशाच चेंडूवर व्होजेसला बाद केले. दिवसअखेर ख्वाजा अर्धशतक काढून नाबाद होता, तर अष्टपैलू मिशेल मार्श त्याला साथ देत होता.

धावफलक 
दक्षिण आफ्रिका ः पहिला डाव ः 242 
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः 244 

दक्षिण आफ्रिका ः दुसरा डाव ः 160.1 षटकांत 8 बाद 540 (डीन एल्गर 127, जेपी ड्युमिनी 141, क्विंटन डीकॉक 64, व्हरनॉन फिलॅंडर 73, केशव महाराज नाबाद 41, स्टार्क 1-114, हेझलवूड 2-107, सीड्‌ल 2-62, मिशेल मार्श 2-77) 

ऑस्ट्रेलिया ः दुसरा डाव ः शॉन मार्श झे. फाफ गो. रबाडा 15, डेव्हिड वॉर्नर धावचीत 35, उस्मान ख्वाजा खेळत आहे 58, स्टीव स्मिथ झे. डीकॉक गो. रबाडा 34, ऍडम व्होजेस झे. डीकॉक गो. रबाडा 1, मिशेल मार्श खेळत आहे 15, अवांतर 11, एकूण 55 षटकांत 4 बाद 169 

बाद क्रम ः 1-52, 2-52, 3-144, 4-146 
गोलंदाजी ः कागिसो रबाडा 16-2-49-3, व्हरनॉ फिलॅंडर 12-3-36-0, जेपी ड्युमिनी 8-1-18-0, केशव महाराज 17-6-40-0, कुक 2-0-16-0.  

Web Title: Test between Australia and South Africa