मिशन एव्हरेस्ट : कँप 2 पर्यंतची चढाई सुरळीत, सुरक्षित

उमेश झिरपे
शनिवार, 20 मे 2017

या भागाचे आणखी एक आव्हान म्हणजे अंतिम चढाईच्यावेळी तुम्ही कँप १ ते कँप २ हा टप्पा थेट पूर्ण करता. यास डायरेक्ट मुव्हमेंट असे संबोधले जाते. अंतिम चढाईच्यावेळी कँप २ हा बेस कँपसारखा वापरला जातो. बेस कँप ते कँप २ ही चढाई साधारण बारा तासांची असते.

शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता. मध्यरात्री दीड वाजता निघायचे ठरले होते. त्यामुळे त्याआधी मी आणि विशाल कडुसकरने दोन-तीन तास विश्रांती घेतली. आम्ही टेंटमध्ये पाठ टेकली. आमच्या कुकने १२.३० वाजता नाष्टा तयार ठेवेन असे कळविले होते. त्यामुळे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उठलो. निघण्यापूर्वी बेस कँपवरील आमच्या टेंटमधील मंदीरात पुजा केली. त्यानंतर गणपती, स्वामी समर्थ, शंकर, देवी, दत्त यांची आरती केली. त्यानंतर उपमा आणि चहा घेतला. कुकने आम्हाला पॅक लँच दिले होते. त्यात उकडलेली अंडी आणि बटाट्याची भाजी होती. याशिवाय आमच्याजवळ चिक्की, ड्राय फ्रुट्स आणि चॉकलेट होती.

निघण्यापूर्वी पुण्यातील काही जणांशी संपर्क साधला. आमच्या सॅक आधीच भरून तयार ठेवल्या होत्या. त्या घेऊन रवाना झालो. मध्यरात्री निघाल्यनंतर खुंबू आईसफॉल क्रॉस करायला आम्हाला साधारण साडेचार तास लागले. यानंतर आम्हाला कँप १ ऊन पडायच्या आत क्रॉस करायचा होता. वरच्या कँपला पहाटे साडे पाच-सहाच्या सुमारासच ऊन पडते. ऊन पडल्यानंतर बर्फ वितळू लागतो. त्यामुळे हिमनग किंवा हिमकडे कोसळण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे मार्गात लावलेल्या शिड्या, अँकर्स यांची पोझीशन सुद्धा हालते.

आमची चढाई अगदी नियोजनानुसार झाली. आम्ही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कँप १ला पोचलो. त्यानंतर आम्ही तेथे थोडा वेळ थांबलो. आम्ही अर्धा तास थांबलो. तेथे उपमा खाल्ला. आणखी अर्धा तास विश्रांती घेतली. मग पुढील चढाई सुरु केली. कँप २ला दुपारी १२ पर्यंत पोचायचे नियोजन होते. कँप १ ते कँप २ या मार्गात सपाट जागा आहे. चढाई नसली तरी हा टप्पा सोपा नक्कीच नाही.

कँप १ ची उंची ५९००, तर कँप २ ची उंची ६३००-६४०० मीटरपर्यंत आहे. तुम्ही कँप २ ला तुमचा टेंट कुठे लावता यानुसार ही उंची बदलते. कँप १ला तुम्ही पोचता आणि कँप २च्या दिशेने नजर टाकता तेव्हा तो आय-लेव्हलला वाटतो. याचा अर्थ हे अंतर सपाटच आहे असे वाटते. तांत्रिक चढाई नाही म्हणून हा मार्ग सोपा नक्कीच नसतो, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. चालायला सुरवात केल्यानंतर पहिल्या काही पावलांमध्येच ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही अॅक्लमटाईज कसे झाला आहात यावर सगळी आगेकूच अवलंबून असते.

जो कुणी या भागात जाऊन आला आहे त्यालाच या मार्गाची कल्पना येईल. तरी सुद्धा मी शब्दांत शक्य तेवढे वर्णन करायचा प्रयत्न करतो. कँप १ ते कँप २ यातील भागास वेस्टर्न कुम असे संबोधले जाते. डावीकडे एव्हरेस्टचा पश्चिम भाग (वेस्ट शोल्डर), समोर ल्होत्से आणि उजवीकडे नुप्स्ते अशी तीन शिखरे आहेत. मध्ये ही जागा आहे. त्यात अनेक ठिकाणी क्रीव्हास म्हणजे हिमभेगा आहेत. खुंबू आईसफॉल आणि या मार्गातील हिमभेगांमध्ये फरक आहे. खुंबूत तुम्हाला बऱ्याचदा हिमभेगांची खोली दिसू शकते. इथे मात्र तसे नसते. याचे कारण या हिमभेगा फार खोल आहेत. नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला दीड-दोनशे फूट खोलीचा अंदाज येऊ शकतो.

कँप १ ते कँप २ या भागात बऱ्याच ठिकाणी रोप फिक्स झालेला नसतो. रुट ओपनिंग झाले म्हणजे शंभर टक्के रोप-फिक्सींग झाला असे होत नाही. ज्या भागात जास्तच हिमभेगा आहेत, तेथे रोप लावतात. इतर ठिकाणी तो नसतो. त्यामुळे अगदी ५० मीटर अंतर सुद्धा इकडे-तिकडे करून चालत नाही. याचे कारण अनेक हिमभेगा बर्फाखाली दडलेल्या असतात. त्यात हिडन क्रीव्हासेस असे संबोधले जाते. वरून त्यांचा अंदाज येत नाही.

हा भाग तिन्ही बाजूंनी पर्वतांनी वेढलेला असल्यामुळे ढग आले किंवा वारा वाहू लागला तर लगेच तापमान खाली येते. हेच हवा कमी असल्यामुळे तेथे उष्णता सुद्धा निर्माण झालेली असते. गिर्यारोहकांच्या भाषेत तेथील वातावरण सोलर कुकरसारखे असते. २०१२ मधील मोहीमेच्यावेळी अॅक्लमटाईज होताना याच भागात नुप्त्सेवरून हिमकडा कोसळला होता. अलिकडे इतका मोठा हिमप्रपात झाल्याचे ऐकले नाही.

या भागाचे आणखी एक आव्हान म्हणजे अंतिम चढाईच्यावेळी तुम्ही कँप १ ते कँप २ हा टप्पा थेट पूर्ण करता. यास डायरेक्ट मुव्हमेंट असे संबोधले जाते. अंतिम चढाईच्यावेळी कँप २ हा बेस कँपसारखा वापरला जातो. बेस कँप ते कँप २ ही चढाई साधारण बारा तासांची असते. 

कँप २ चे लोकेशन खडकाळ (रॉकी) असते. आम्ही घालतो ते बूट आणि क्रम्पॉन्स हे बर्फाळ भागासाठी अनुकूल असतात. त्यामुळे खडकाळ भाग येतो तेव्हा जपून चालावे लागते.

आम्ही बेस कँप ते कँप 2 हे अंतर दहा तासांत पोचलो. माझ्याबरोबर दोर्ची शेर्पा, तर विशालबरोबर लाक्पा नोर्बू हा शेर्पा आहे.
(क्रमशः)