पावणेपाच तासांच्या सामन्यानंतर नदाल "विम्बल्डन'बाहेर

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

नदाल याने कारकिर्दीमध्ये मिळविलेल्या एकूण 15 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांपैकी दोन विजेतेपदे विम्बल्डन येथे मिळविली आहेत. मात्र 2011 नंतर नदाल याला स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही प्रवेश मिळविता आलेला नाही

लंडन - स्पेनचा जगप्रसिद्ध टेनिसपटू रॅफेल नदाल याला विम्बल्डन स्पर्धेमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तब्बल चार तास 47 मिनिटे चाललेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात 16 व्या मानांकित क्रोएशियाच्या गिलेस मुलेर याने नदालला 6-3,6-4,3-6,4-6,15-13 असे पराभूत केले.

या सामन्यात दोन सेट गमाविल्यानंतरही नदालने जोरदार पुनरागमन करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र पाचव्या सेटमध्ये त्याला पराभूत व्हावे लागले. या विजयाबरोबरच 34 वर्षीय मुलेर याने विम्बल्डनच्या उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

नदाल याने कारकिर्दीमध्ये मिळविलेल्या एकूण 15 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदांपैकी दोन विजेतेपदे विम्बल्डन येथे मिळविली आहेत. मात्र 2011 नंतर नदाल याला स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही प्रवेश मिळविता आलेला नाही.