पुरुषांच्या मैदानावरच महिलांची कबड्डी लीग?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

मुंबई - प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमाद्वारे महिला कबड्डीचे पदार्पण होणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत; मात्र, पुरुषांच्या लीग कार्यक्रमास धक्का न लावता महिलांच्या लढती घेण्याचे ठरले आहे. आता ही लीग झालीच तर त्यातील लढती पुरुषांच्या मैदानावरच होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील धारावी क्रीडा संकुलात महिलांची लीग खेळवण्यासाठी निवड चाचणी होत आहे. त्या चाचणीसाठी ६१ खेळाडूंना निमंत्रित केले असल्याचे सांगितले होते. आता प्रत्यक्ष किती खेळाडू चाचणीत सहभागी झाल्या, याची अधिकृत माहिती मिळाली नाही, पण चाचणीस सर्व खेळाडू आल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात सर्व प्रश्‍नास स्टार स्पोर्टस्‌चे प्रतिनिधी तुम्हाला कळवण्यात येईल, एवढेच सांगत होते. या चाचणीसाठी राज्यातील अपेक्षा टाकळे, अभिलाषा म्हात्रे, सोनाली शिंगटे, दीपिका जोसेफ, रक्षा नारकर, सुवर्णा बारटक्के, तृप्ती सुवर्णा यांची निवड झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले, पण त्यासही दुजोरा मिळाला नाही.

महिलांच्या कबड्डी लढती नियमितपणे १२ बाय ८ मीटर मैदानावर होतात, पण महिलांच्या संघनिवडीसाठी आखलेले मैदान पुरुषांच्या मैदानाएवढे म्हणजेच १३ बाय १० मीटर इतके होते. महिलांना हे मैदान नेहमीपेक्षा मोठे वाटत होते. नेमके सांगायचे झाले तर त्यांच्या लढतीतील बोनस रेषेच्या इथे निदान रेषा आली होती. त्यामुळे निवड चाचणीच्या वेळी झटापटी या बोनस रेषेजवळ होण्याऐवजी निदान रेषेवरच होताना दिसत होत्या.