खासबागेत विजयने युद्ध जिंकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग मैदानात रंगलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीत मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळने हरियानाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिस्सा डावावर आस्मान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषकावर आपले नाव कोरले.

कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग मैदानात रंगलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीत मोतीबाग तालमीच्या विजय धुमाळने हरियानाच्या युधिष्ठिर कुमारला पोकळ घिस्सा डावावर आस्मान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषकावर आपले नाव कोरले.

न्यू मोतीबाग तालमीचा राजाराम यमगर विरुद्ध मोतीबाग तालमीचा विजय पाटील यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. पैलवान प्रतिष्ठान युवा चषकाच्या प्रथम क्रमांकाच्या लढतीत मोतीबाग तालमीच्या संतोष लवटेने हैदराबादच्या फैजल अलीला चितपट केले. काळाईमामच्या विकास ऐनपुरेने हरियानाच्या जयकुमारला मोळी डावावर पराभूत करत दुसऱ्या क्रमांकाची लढत जिंकली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत कळंब्याच्या सागर इळकेने सेनादलाच्या मंजूनाथ धारवाडला आस्मान दाखवले.

पैलवान प्रतिष्ठानतर्फे मैदानाच्या नूतनीकरणानंतर यंदा पहिले मैदान झाले. हलगीच्या कडकडाटात शेकडो लढतींनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. लहान गटातील पाचगावमधील नरसिंह तालमीच्या आदित्य ताटेने मैदानात पहिली लढत जिंकली. या गटात चुरशीच्या लढती झाल्या. विजय धुमाळ विरुद्ध युधिष्ठिर कुमार यांच्यातील पहिल्या क्रमांकाच्या लढतीस आठ वाजून बारा मिनिटांनी सुरवात झाली. दोघांनी सुरवातीला खडाखडी करत एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. युधिष्ठिरने दोन मिनिटांनंतर एकेरी पटावर विजयवर कब्जा घेतला. युधिष्ठिरची पोटाभोवतीची किल्ली तोडत विजयने शिताफीने सुटका करून घेतली. त्यानंतर विजयनेच युधिष्ठिरवर एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो फसला आणि युधिष्ठिरनेच त्याच्यावर कलाजंग डाव टाकला. त्यातूनही विजय सुटला व त्याने युधिष्ठिरवर पंधराव्या मिनिटाला ताबा मिळविला. त्यातून सुटण्याचा युधिष्ठिरने आटोकाट प्रयत्न केला. पण, विजयने पोकळ घिस्सा डावावर त्याच्यावर मात केली. दुसऱ्या क्रमांकाची राजाराम यमगर विरुद्ध विजय पाटील यांची लढत बराच वेळ चालली. दोघेही घामाघूम होऊन डाव-प्रतिडाव टाकत होते. अखेर गुणांवर ही लढत घेण्याचा निर्णय झाला. तरीही दोघा मल्लांना गुण घेण्यात यश आले नाही. पर्यायाने ही लढत बरोबरीत राहिली.

पैलवान प्रतिष्ठान युवा चषकासाठी पहिल्या क्रमांकाची संतोष लवटे विरुद्ध मूळचा हैदराबादचा व काळाईमाम तालमीचा मल्ल फैजल अली यांच्यात सहा वाजून बावीस मिनिटांनी लढत सुरू झाली. दहा मिनिटांनंतर दुहेरी पट काढण्याचा संतोषने प्रयत्न केला. पंधराव्या मिनिटाला संतोषने फैजलला उचलून त्याच्यावर पकड घेतली. त्यानंतर त्याने पाय लावून घिस्सा डाव टाकून फैजलला चितपट करण्याचा प्रयत्न केला. हाताचा घुटणा मानेवर ठेवून संतोषने फैजलला जेरीस आणले. मात्र, विसाव्या मिनिटाला फैजल शिताफीने त्याच्या हातातून निसटला. त्यानंतर ही लढत गुणांवर झाली. पहिला गुण घेणाऱ्या मल्लास विजयी घोषित करण्याचा निर्णय झाला. अखेर सत्ताविसाव्या मिनिटाला संतोषने दुहेरी पटावर फैजलला अस्मान दाखवून कुस्तीप्रेमींची वाहवा मिळविली.

सात वाजून चाळीस मिनिटांनी जयकुमार विरुद्ध विकास ऐनपूरे यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची लढत झाली. विकासने एकेरी पटावर जयकुमारचा कब्जा घेतला. जयकुमारची शरीरयष्टी पाहता विकासचा कस लागला होता. ऐन मोक्‍याच्या क्षणी विकासने जयकुमारला मोळी डाव टाकून खासबागेच्या मातीची चव चाखायला लावली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सागर इळकेने मंजूनाथवर मानेवरचा घुटना डाव टाकला. मच्छीगोत टाकून मंजूनाथला मैदानावर लोळविण्यासाठी कसब पणाला लावले. त्यातून मंजूनाथ सुटला. पण, पोकळ घिस्सा डावातून त्याची सुटका झाली नाही. अन्य लढतीत तानाजी कुराडे (नंदगाव), अक्षय माने (कळंबा), विशाल तवले (कळंबा), अमित कांबळे (काळाईमाम), सौरभ माळी (शरद साखर कारखाना), दिगंबर पाटील (पाचगाव) विजयी झाले.
अन्य विजेते असे : सचिन घुंगरे (न्यू मोतीबाग), भगतसिंग खोत (कोतोली), महेश पाटील (शाहू कुस्ती केंद्र), माणिक कारंडे (कुंभी), महेश पारेकर (राष्ट्रकुल आखाडा), सचिन कदम (कळंबा), आकाश पोवार (बाचणी), शरद मगदूम (कळंबा), सूरज जाधव (कळंबा), विजय शिंदे (दिंडनेर्ली), वैभव खोत (ढोणेवाडी), बबलू पाटील (काळाईमाम), सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), अजय कुमार (काळाईमाम), अनिकेत हवालदार (दिंडनेर्ली), अतुल चेचर (पोर्ले), अक्षय पाटील (दिंडनेर्ली), बबलू सरनाईक (कंदलगाव), नितीन कांबळे (राशिवडे), विनायक खोत (दोनवडी), ओंकार लाड (राशिवडे), सोहेल मोहिते (सरूड), भरत जाधव (राक्षी), हर्षवर्धन पाटील, साईल बोटे, स्वराज्य साळुंखे, गणेश तेरसे (सर्व नरसिंह तालीम, पाचगाव), हर्षवर्धन मिसाळ (शिवा आखाडा, हणबर गल्ली, कागल), सुमीत कांबळे, पार्थ पाटील (इस्पुर्ली), योगेश भोसले, शुभम हेगडे, प्रथमेश जाधव (सर्व कळंबा), तन्मय कनोजे, गुंडाजी पाटील (वरणगे-पाडळी), विघ्नेश चौगले (नंदगाव), प्रथमेश रानगे (वाशी), समर्थ शेटके (हदनाळ), साई राबाडे (काळाईमाम तालीम), केशव पवार (शाहू विजयी गंगावेस तालीम).

मैदानात जिल्हाधिकाऱ्यांचे कुटुंब...
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, त्यांचे वडील देवेंद्रकुमार, आई आशा, पत्नी अंशूमाला, मुलगा अश्‍मित हे कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते काही लढती लावण्यात आल्या.

संयोजन....
पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, रुस्तुम-ए-हिंद दादू चौगुले, हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील-आसगावकर, उपमहाराष्ट्र केसरी संभाजी पाटील-कुडित्रेकर, पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मोरे,
भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक संभाजी जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील उपस्थित होते. महेश नलवडे, अरुण मोरे, संदीप जाधव, दत्ता मोरे, रतन बाणदार, जयाजी घोरपडे आदींनी संयोजन केले.

Web Title: wrestling match at khasbag