'टॉप्स'साठी कुस्तीची नवी पिढी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सुशील कुमार, योगेश्‍वर दत्तसह फोगट बहिणींना वगळले 
नवी दिल्ली - त्यांनी देशासाठी कुस्तीमध्ये नक्कीच अभिमानास्पद कामगिरी केली यात शंकाच नाही; पण त्यांचा काळ आता संपला आहे.

ऑलिंपिकमधून त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा नाही. अशी कठोर भूमिका घेत भारतीय कुस्तीगीर महासंघाने सरकारच्या "टॉप्स' (टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम) योजनेसाठी नव्या पिढीला स्थान दिले आहे. सुशील कुमार, योगेश्‍वर दत्त यांच्यासह फोगट बहिणींनाही या योजनेतून वगळले आहे. 

कुस्ती महासंघाकडून सरकारला सादर करणाऱ्या यादीतून ऑलिंपिक पदक विजेत्या सुशील, योगेश्‍वरसह राष्ट्रकुलपदक विजेत्या गीता, बबिता फोगट बहिणींना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर राहुल आवारे, अमित कुमार दहिया, प्रवीण राणा यांनाही नव्या यादीत स्थान मिळालेले नाही. जुन्या यादीतील केवळ साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग यांचाच पुन्हा समावेश करण्यात आला आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी मल्लांची निवडीचे समर्थन केले. ते म्हणाले, 'आमच्या प्रशिक्षकांनी प्रत्येक मल्लाची कामगिरी राष्ट्रीय शिबिरात बघितल्यानंतरच ही निवड केली आहे. आमच्या प्रशिक्षकांना या मल्लांकडून पदकाची खात्री वाटते.'' 

भविष्यातील कामगिरी आणि तंदुरुस्ती लक्षात घेऊन यादीत बदलही होऊ शकतो; पण सध्या तरी हेच आमचे सर्वोत्तम मल्ल आहेत, असे सांगून तोमर म्हणाले,""लग्नानंतर साक्षी कुस्ती खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यानंतरही तिला पुन्हा स्थान दिले आहे.'' 

त्यांच्या निवृत्तीची वेळ 
सुशील आणि योगेश्‍वरबाबतही विनोद तोमर ठाम होते. त्यांची तर निवृत्तीची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले,""दोघेही राष्ट्रीय सराव शिबिरात सहभागी नव्हते. त्यांनी कुठलीही निवड चाचणी दिलेली नाही. योगेश्‍वरने "रिओ' आपली अखेरची स्पर्धा असेल, असे सांगितले होते. सुशीलही आता राष्ट्रीय निरीक्षक झाला आहे. सरकारनेच त्याची नियुक्ती करून त्याचे भविष्य ठरवले आहे. अशा वेळी त्याचा कुस्ती मैदानातील सहभाग हा परस्पर हितसंबंधाचा भाग होऊ शकतो.'' 

भारतीय कुस्तीगीर महासंघाचा निर्णय योग्य आहे. आता गीता आणि बबिताचा वारसा पुढे नेण्याची वेळ विनेश आणि रितू यांची आहे. 
- महावीर सिंग, गीता, बबिताचे वडील 

"टॉप्स'साठी निवडलेले कुस्तीगीर 
संदीप तोमर (57 किलो), बजरंग (65 किलो), जितेंद्र (74 किलो), रितू फोगट (45 किलो), विनेश फोगट (48 किलो), साक्षी मलिक (58 किलो), दिव्या ककरन (69 किलो). 

कुस्तीगीर महासंघाने योग्य निर्णय घेतला आहे. मी जर कुस्ती खेळतच नाही, तर मला सरकारचा निधी घ्यायचाही अधिकार नाही. 
- सुशील कुमार, भारताचा डबल ऑलिंपिकपदक विजेता कुस्तीगीर

Web Title: wrestling new player for tops