धोनीबरोबर "ती जादु' पुन्हा एकदा अनुभवेन: युवराज

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

भारतीय संघाचा पुढील कर्णधार त्याने विराटमध्ये पाहिला आहे. अर्थातच, अजूनही भारतीय संघास एक खेळाडू म्हणून अजून तो भरपूर योगदान देऊ शकतो

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार होण्याच्या महेंद्रसिंह धोनी याच्या निर्णयाचे प्रसिद्ध अष्टपैलु खेळाडू युवराज सिंह याने स्वागत केले आहे. आता धोनी याच्याबरोबर खेळताना पुन्हा एकदा "त्या जुन्या दिवसांची' जादु अनुभवता येईल, अशी भावना युवराजने व्यक्‍त केली आहे. युवराजचेही भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे.

""आम्ही दोघांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती, तसे वातावरण आता असेल. अर्थातच, मी त्याच्याआधी पुष्कळ आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र तेव्हा आम्ही अत्यंत निर्भयपणे एकत्र खेळत असू. आता येत्या मालिकेमध्येही आम्ही असे खेळू,'' असे युवराजने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युवराजने 2000 मध्ये; तर धोनीने 2004 मध्ये पदार्पण केले होते.

धोनीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाचेही युवराजने मोकळ्या मनाने स्वागत केले. ""पुढील कर्णधारास 2019 च्या विश्‍वकरंडकासाठी संघाची बांधणी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, अशी त्याची धारणा असावी. यामुळेच त्याने घेतलेला हा निर्णय अत्यंत चांगला आहे. भारतीय संघाचा पुढील कर्णधार त्याने विराटमध्ये पाहिला आहे. अर्थातच, अजूनही भारतीय संघास एक खेळाडू म्हणून अजून तो भरपूर योगदान देऊ शकतो,'' असे युवराजने म्हटले आहे.