एक दिवस गणपती बाप्पासाठी...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

नाना जगदाळेंनी केले ५० गणपती मोफत घरपोच

औरंगाबाद - आबालवृद्धांपासून सर्वांना वाट बघायला लावणारा गणेशोत्सव. विघ्नहर्त्याचे आगमन सुखद व्हावे, हीच सर्वांची मनोमन इच्छा असते. याच सुखद आगमनासाठी हर्सूल सावंगी येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेले सुनील ऊर्फ नाना जगदाळे (वय ४७) यांनी स्वत:च्या रिक्षाने मोफत घरपोच सेवा सुरू केली. पहिल्याच वर्षी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

नाना जगदाळेंनी केले ५० गणपती मोफत घरपोच

औरंगाबाद - आबालवृद्धांपासून सर्वांना वाट बघायला लावणारा गणेशोत्सव. विघ्नहर्त्याचे आगमन सुखद व्हावे, हीच सर्वांची मनोमन इच्छा असते. याच सुखद आगमनासाठी हर्सूल सावंगी येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेले सुनील ऊर्फ नाना जगदाळे (वय ४७) यांनी स्वत:च्या रिक्षाने मोफत घरपोच सेवा सुरू केली. पहिल्याच वर्षी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

श्री. जगदाळे म्हणाले, ‘‘सोलापूरला एक मुस्लिम बांधव स्वत:च्या रिक्षाने घरपोच गणपती नेण्याची व्यवस्था करतो, अशी बातमी वाचली. त्यापासून प्रेरणा घेऊन मोफत गणपती घरपोच करण्याची सेवा देण्याचा संकल्प केला. पहिलेच वर्ष असल्याने दुपारी बारापर्यंत गणेशभक्‍तांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, त्यानंतर रात्री दहापर्यंत किंचितही उसंत मिळाली नाही. दिवभरामध्ये ५० गणेशभक्‍तांच्या घरी माझ्या रिक्षातून श्रीगणेशाचे आगमन झाल्याचा मोठा आनंद आहे. हा आनंद शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही. या उपक्रमामध्ये माझी पत्नी कल्पना, मुलगा साई आणि मुलगी श्रद्धा यांचाही मोलाचा वाटा लाभला.

गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी रिक्षा सजावटीसाठी मोठी मदत केली. पत्नी आणि मुलीने उत्साहाने आठ किलो झेंडूच्या फुलांपासून पुष्पहार तयार केले. त्याशिवाय लायटिंगच्या सजावटीसाठी मित्रपरिवारानेही मदत केली. पोलिस विभागाचे सहकार्य न विसरण्यासारखे आहे. औरंगपुरा, टीव्ही सेंटर, गारखेडा परिसरातील गणपती विक्रीच्या ठिकाणी पोलिसांनी हाकलून न लावता सहकार्य केले. त्यामुळे मला ५० गणपती भक्‍तांच्या घरी पोचवता आले. यादरम्यान छावणी, मुकुंदवाडी, कांचनवाडी, रेल्वेस्थानक, हडको, सिडको, जाधववाडी, शहागंज, सिटी चौक, पडेगाव, गारखेडा आणि शंभूनगरसह अनेक वसाहतींमध्ये एक फुटापासून अडीच फुटांपर्यंतचे गणपती घरी पोचविले.

काही नवस केला की काय?

यंदा मोफत सेवेचे हे पहिलेच वर्ष असल्याने बहुतांश लोकांना याबाबत माहिती नव्हती. रिक्षावरील बॅनर वाचून त्यांच्यात कुतूहल निर्माण व्हायचे. त्यामुळे गणेशभक्‍त येऊन गणपतीकडे काही मागितले का, काही नवस केला की काय? यांसारख्या असंख्य प्रश्‍नांचा भडिमार दिवसभर सुरू होता. मात्र मी स्वत:च्या इच्छेनुसार करतोय. मी गणपतीकडे काही मागितले नाही, कधी मागणारही नाही. यापुढे आजीवन ही सेवा सुरूच ठेवणार आहे. वर्षातील ३६५ दिवसांपैकी एक दिवस गणपती बाप्पांसाठीच राहील, असा मनोदय श्री. जगदाळे यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Ganapati Bappa for a day ...