ज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - ""आपण ज्या देशात आहोत, त्या देशाचे होता आले पाहिजे. प्रत्येक जाती-धर्माचा आदर करायला हवा. तेव्हाच आपल्याला यशस्वी होता येईल. जगात कोणतीही एक जात श्रेष्ठ नाही. मनात ध्येय बाळगले, तर यश नक्की गाठता येते,‘‘ असे विचार मसाला किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक धनंजय दातार यांनी व्यक्त केले. 

"सकाळ‘ कार्यालयास त्यांनी रविवारी (ता. 18) सदिच्छा भेट दिली. या वेळी संवाद साधताना ते म्हणाले, "" यूएईमध्ये सर्वच देशांतील उद्योजक आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला व्यवसाय करता आला पाहिजे. त्यांची भाषा आली नाही तरी चालेल. मला आजही अरबी भाषा येत नाही. इंग्रजी आलेच पाहिजे म्हणून माझे काही अडले नाही. उद्योग करताना तुमचे टर्न ओव्हर किती आहे यापेक्षा तुमचा नफा किती, हे महत्त्वाचे. कॉस्ट किती, बॅलन्स किती हे खूप महत्त्वाचे आहे; पण एकाची टोपी दुसऱ्याला लावू नका. एकदा नाव खराब झाले तर तुम्हाला कुठेही उभे राहता येणार नाही. कोणताही उद्योग उभारल्यावर तीन वर्षे तरी सेटल व्हायला लागतात. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी उद्योग सोडू नका. उद्योगात स्पर्धा असते. स्पर्धेशिवाय पुढे जात येत नाही. प्रगती करताना आपण कुणावर जळू नये. शत्रू तयार करता कामा नये. वायफळ बोलण्यापेक्षा पॉइंटवर बोलायला शिका. सकारात्मक विचाराने, सर्वांना सोबत घेऊन यश मिळवता येते. उद्योग करताना टेन्शन येते; मात्र टेन्शनला मारणे शिका. घरात आई-बाबा, मुले आपली असतात. बाहेर आपल्यासाठी माणसे धावून येतील अशी माणसे तयार करा.
 
तरुण म्हणतात, की मंदी आहे; मात्र मंदीतसुद्धा संधी शोधायची असते. समुद्राच्या लाटेत पोहणे शिका. 2009 मध्ये मंदी आलेली असतानाही माझी कंपनी 40 टक्के "हाय‘ होती. शिवाय तुम्ही पैसा कमवा; मात्र हा पैसा तुम्हाला एन्जॉय करता आला पाहिजे. हा पैसा फक्तच जमा करून ठेवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.