इये संमेलनाच्या नगरीत सारस्वतांची मांदियाळी

इये संमेलनाच्या नगरीत सारस्वतांची मांदियाळी

पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) - शालेय मुलांचा उत्साह... पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले नागरिक... ढोल-ताशांचा गजर... ग्रंथांच्या पालख्या... विविध रंगीबेरंगी चित्ररथ... नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने दिसणारा उत्सव डोंबिवली शहरामध्ये शुक्रवारी सकाळी दिसत होता... निमित्त होते 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे.संमेलनाच्या निमित्ताने डोंबिवलीतील प्रत्येक रस्त्यावर, चौकांत साहित्य जल्लोषाचे वातावरण होते. चौकांमध्ये रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. गणेश मंदिर संस्थानपासून निघालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये मान्यवरांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. साहित्यनगरीमध्ये दाखल झालेल्या साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी साहित्य संमेलनाला ध्वजवंदन करून या संमेलनातील कार्यक्रमांना प्रारंभ झाला.

मराठी भाषेचा ध्वज फडकत ठेवा
पु. भा. भावे साहित्यनगरीच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रंथदिंडीमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाच्या ध्वजाला वंदन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष, मावळते अध्यक्ष, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, सदस्य, आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये संमेलनस्थळी ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ध्वजाची माहिती देताना हा ध्वज भारतीय उपखंडातील मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. देशभरातील मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्थांचे आणि प्रतिनिधींच्या प्रतीकांचा समावेश या ध्वजात असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

संयुक्त महाराष्ट्रासाठी घोषणाबाजी
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सीमावर्तीय भागांतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी झटत आहेत. हाच आवाज आज संमेलनस्थळीही निनादला. पु. भा. भावे साहित्यनगरीत आलेल्या या मंडळींनी बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर या भागांतील सीमावर्ती भाग मालकी हक्कासह महाराष्ट्रामध्ये सामील करावा, अशी मागणी केली. या वेळी लक्ष्मण ईश्‍वर, प्रकाश अष्टेकर, प्रदीप मुरकुटे, चांगा पाटील, संभाजी कंबरकर, नारायण जाधव, अनंत पाटील, प्रताप पाटील या कर्नाटकमधून आलेल्या मंडळींनी आपली मागणी मांडली. 1970 पासून संयुक्त महाराष्ट्रासाठी आमचा लढा सुरू आहे. प्रत्येक मराठी साहित्य संमेलनामध्ये जाऊन तेथे येणाऱ्या राजकीय मंडळींना आमच्या व्यथा सांगण्याचे कर्तव्य बजावणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये कानडी शासकांकडून मराठी नागरिकांचे शोषण होत आहे. ते थांबण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज लक्ष्मण ईश्‍वर यांनी व्यक्त केले.

सेल्फीचा मोह सुटेना
ग्रंथदिंडीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या तरुणाईला सेल्फीचा मोह आवरत नव्हता. त्यांच्याप्रमाणेच साहित्यिक, मान्यवर आणि राजकीय मंडळींनाही सेल्फीचा मोह आवरला नाही. पुढे संमेलननगरीमध्ये पोचल्यानंतरही तिथल्या सजावटीसह सेल्फी घेण्याचा सोहळा अधिकच रंगला.

म्हैसूरचा पाहुणा भारावला
म्हैसूर येथे राहणारे डॉ. संतोष कुमार महांती महाराष्ट्रातील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी डोंबिवलीत आले होते. रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तेथपासून संमेलनस्थळी पोचेपर्यंत रस्त्यावरील ग्रंथदिंडी पाहून त्यांना वेगळा काहीतरी कार्यक्रम असेल, असे वाटले होते. मात्र, विचारपूस केल्यानंतर साहित्य संमेलनासाठी हा सांस्कृतिक उत्सव सुरू असल्याचे ऐकून ते भारावले. साहित्यासाठी इतका मोठा उत्सव देशातील कोणत्याही भाषेमध्ये आतापर्यंत पाहण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मराठी साहित्यिकांना भेटण्याबरोबरच या उत्सवामध्ये सहभागी होणे आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com