आश्रमशाळेतील तेल, साबण सभागृहात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या बालगृहांची अवस्था वाईट आहे. बालगृहात सध्या 70 हजार बालकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

निकृष्ट दर्जाच्या खरेदीवर अजित पवारांची टोलेबाजी
मुंबई - आदिवासी आश्रमशाळांतील गरिब विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट दर्जाचे तेल, साबण व टूथपेस्ट खरेदी करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केला. अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करताना पवार यांनी या निकृष्ट साहित्याचे नमुनेच सभागृहात सादर करून या संपूर्ण खरेदीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या संपूर्ण खरेदीच्या चौकशीची सुरवात केल्याची माहिती आदिवासी विभाग मंत्री विष्णू सवरा यांनी दिली.

देशभरात पॅराशूटचे तेल प्रसिद्ध असताना आदिवासी विभागाने मात्र "चिना‘ नावाचे तेल प्रति बॉटल दहा रुपये अतिरिक्त दराने खर्च केल्याचा दाखला दिला. त्यासोबतच डायना हे अपरिचित साबण, विनवॉश नावाचे साबण पुरवल्याचे त्यांनी नमुने दाखविले.

आदिवासी विभागाच्या माध्यमातून 552 आश्रम शाळा असून, त्यापैकी 260 आश्रमशाळांना स्वत:च्या इमारती नाहीत. पोषण आहार, पिण्यास पाणी मिळत नाही, शाळांमध्ये शौचालये नाहीत, शौचासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावर जावे लागत आहे, याकडेही पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

"डायना‘ या नावाचा साबण आहे, हे कधी ऐकले होते का? असा प्रश्न करत तो साबणही पवारांनी सभागृहात दाखवला. कपडे धुण्याचा साबण हा दिसायला "रिन‘ कंपनी सारखा आहे, पण प्रत्यक्षात तो "विश्वास‘ नावाच्या कंपनीचा साबण मुलांना दिला जात आहे. अशी खरेदी करून गरीब मुलांचे का नुकसान करता? असा थेट सवालही त्यांनी सवरा यांना केला.

याशिवाय ऊर्जा विभागावर बोलताना ते म्हणाले, ‘सरकारी वीज प्रकल्प बंद ठेवून खासगी वीज विकत घेण्याचा उद्योग सरकारने चालवला आहे. सरकारचे जवळपास 28 वीज संच बंद आहेत. कर्मचारीही हे संच सुरू करावेत म्हणून आंदोलने करत आहेत.‘‘