शिवसेनेच्या स्वबळाच्या गर्जनेने सरकारला अस्थिरतेचा "हादरा'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - सतत 25 वर्षे गळ्यात गळे घालून राजकारणात युतीचा विक्रम करणाऱ्या शिवसेना-भाजपच्या युतीची अखेर उद्धव ठाकरे यांनी "साठा उत्तरी कहाणी सफळ संपूर्ण' केली. महानगरपालिका व जिल्हा परिषदांत यापुढे भाजप सोबत युती राहणार नाही, अशी गर्जना करत शिवसेनेने युतीतल्या सत्तेला पहिला हादरा दिला. अत्यंत आवेशात उद्धव यांनी युतीशी काडीमोड घेत असल्याचे जाहीर केल्याने राज्यभरात शिवसेना व भाजपमधील धुमसत्या आगीचा निखारा पेटला आहे.

उद्धव यांच्या घोषणेला शिवसैनिकांनी अक्षरक्ष: डोक्‍यावर घेत युती तोडल्याचे जंगी स्वागत राज्यभरात केले. तर भाजपच्या नेत्यांनी "आलात तर तुमच्या सोबत, अन्यथा तुमच्या शिवाय, पण परिवर्तन होणारच', असा आशावाद स्पष्ट करत मुंबई महापालिकेच्या आखाड्यात शिवसेनेचा स्वबळावर सामना करण्याचे मनसुबे जाहीर केले.

मात्र महानगरपालिका व जिल्हा परिषदांत यापुढे भाजप सोबत कुठेही युती राहणार नाही, असे उद्धव यांनी जाहीर केल्याने शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे. पण केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले. युती तोडण्याच्या निर्णयाचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.