पॅशनची कट्यार काळजात आत आत जाऊ दे!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्याशी ‘साम’चे संपादक संजय आवटे यांनी साधलेल्या मुक्त संवादाने उपस्थित तरुणाईला कह्यातच घेतले. सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करण्यापासून आपली खरी पॅशन ओळखण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ओघवत्या शब्दांत समोर आला. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्याशी ‘साम’चे संपादक संजय आवटे यांनी साधलेल्या मुक्त संवादाने उपस्थित तरुणाईला कह्यातच घेतले. सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करण्यापासून आपली खरी पॅशन ओळखण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ओघवत्या शब्दांत समोर आला. 

मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. वडील बॅंकेत नोकरीला, आईला गायनाची आवड. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवले गावात अगदी लहानपणापासून जायचो. अभंगातले सूर तेव्हाच भावले. दहावीमध्ये चांगले गुण मिळाले, त्यामुळे पुण्यातील कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता. मित्रांनी सांगितलं फर्ग्युसनमध्ये जा. तिकडे प्रवेश घेतला.

आपल्याला चांगले मार्क्‍स पडतात आणि आपण पहिले येतो म्हणजे आपण हुशार असतो, असा आपला आणि इतरांचा ग्रह होतो; पण मला वाटतं एखादी गोष्ट मार्कांसाठी नाही तर हृदयाच्या आनंदासाठी आपण जेव्हा करतो आणि ती जेव्हा चांगली होते तेव्हा आपण खरे हुशार असतो. आपल्या मनात जेव्हा असा खरा आनंद जागतो ना तेव्हा आपण हुशार असतो! मलाही कशामुळे खरा आनंद होतो, हे जर मला वेळेतच कळलं असतं ना तर मी कोणाकोणाचं ऐकून सायन्सला प्रवेश घेतला नसता. 

लहानपणापासून गायनाची आवड लागली त्याला कारण आईचे संस्कार हे आहेच. तीन-चार वर्षांचा होतो तेव्हापासून आई माझ्याबरोबर संगीतमय खेळ खेळायची. गाण्यातला राग ओळखून दाखव, सरगममध्ये म्हणून दाखव, असे खेळ असतं. मला खूप आवडायचे ते... 

चांगल्या शिक्षणामुळे सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी मिळाली. साधारणपणे चांगले पैसे मिळवणं म्हणजे गुड लाईफ; पण माझ्यासाठी गुड लाईफची परिभाषा निराळी आहे. दिवसभर खूप गाता येणं म्हणजे माझ्यासाठी गुड लाईफ. ‘रिच लाईफ’चा अर्थ केवळ पैसा नाही. आपण नेमकं कशानं समृद्ध होतो हे कळणं, मग त्याने समृद्ध होणं शक्‍य झालं तरच आपण रिच होतो! 

अमेरिकेत राहून मी माझं गायन कसं जपू, असा प्रश्‍न मी भास्कर चंदावरकरांना विचारला होता. ते म्हणाले होते, ‘खूप जग फिर, वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घे. तुझं संगीत तुला याच प्रवासात गवसेल.’ मला माझं संगीत समोर दिसतं होतं. पण, ते मला माझ्या अगदी जवळ हवं होतं. मग लंडनमध्ये वगैरे लहान-मोठे कार्यक्रम करून हौस भागवत होतो. पण, लहानपणापासून एखादी गोष्ट तुम्हाला साद घालत असेल तर त्याला प्रतिसाद देणं भाग पडतंच. या सादेला प्रतिसाद म्हणून मी गायनाचे क्‍लास घ्यायला सुरुवात केली. आजही मी फार काही सॉलीड करतोय असं नाही वाटत मला. जे काही करतोय संगीताच्या क्षेत्रात, तो फक्त प्रतिसाद आहे, संगीताच्या सादेला आलेला.
‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो माझा माईलस्टोन असल्याचं लोक म्हणतात. पण, खरं सांगू, माझ्या दहावीच्या सुटीत पंडित अभिषेकीबुवांकडे मी गाणं शिकायला गेलो, तो माझ्या आयुष्यासाठी माईलस्टोन होता, असं मला वाटतं. अभिषेकीबुवांकडे संगीत शिकायला गेलो तेव्हा संगीताचं गारूड काय असतं ते कळलं. 

पालकांनाही मला काही सांगायचंय. त्यांनी स्वत:च्या संस्कारांवर विश्‍वास ठेवायला हवा आणि मुलांना त्यांना जे हवं ते क्षेत्र निवडू द्यायला हवं. धडपडतील काही काळ; पण त्यातून चांगलंच घडेल..

महाराष्ट्र

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली....

05.18 AM

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

04.51 AM

कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्षाला राज्यात बऱ्याच वर्षांनी सत्ता मिळालेली आहे. पुन्हा सत्तेवर येऊ का नाही हे त्यांना माहीत...

04.45 AM