सोप्या गोष्टींचा नव्हे, उत्तमतेचा ध्यास घ्या!

raghuram
raghuram

‘रोडीज’ या टीव्ही मालिकेमुळे तरुणाईचा लाडका बनलेला रघुरामने आधी स्पॉटबॉय म्हणून काम केलं होतं. ‘साम’चे संपादक संजय आवटे यांनी त्याला बोलतं केलं. कोणत्याही उत्तम करिअरमागे संघर्ष असतोच, हे सांगताना रघुरामने तरुणाईच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवत, त्यांना कानपिचक्‍या देत त्यांना जे जे उन्नत-उदात्त-उत्तम आहे त्याचा ध्यास कसा घेतला पाहिजे, हे सांगितलं.

तुम्हाला खरंखरं सांगतो, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला कॉलेजमध्ये माझी हजेरी शून्य होती. लेक्‍चर अजिबात अटेंड करायचो नाही; पण हेही सांगतो वयाच्या २०व्या वर्षी मी काम करायला लागलो होतो. मी स्पॉटबॉय म्हणून काम सुरू केलं. गेली २०-२२ वर्षे तरुणांबरोबर संवाद साधतोय. अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटतो; पण जाणवणारी गोष्ट ही की खूप वेगाने बदलतंय सारं...

तुम्हा आजच्या तरुणांपेक्षा आमचं तेव्हाचं आयुष्य अधिक सरळ होतं; पण तुम्ही लक्षात घ्या, भविष्यकाळात नाही वर्तमानकाळात जगा. तंत्रज्ञान, सोशल नेटवर्किंगमुळे सगळंच बदललेलं आहे, त्याची नोंद घ्या. भविष्यासाठी प्रयत्न कराच; पण वर्तमानकाळ विसरू नका. आजूबाजूला सजगपणे पाहा. अर्थात अण्णा हजारेंच्या चळवळीत लाखो तरुण रस्त्यावर उतरले हे विलक्षण आहे. ते तुमच्या सजगतेचे प्रतीक आहे. म्हणूनच मी तुम्हाला काही सांगायला नाही तर तुमच्याकडून शिकायला आलोय; पण त्याचवेळी काही व्हर्च्युअल गोष्टीही होताहेत. माझा एक मित्र समुद्रकिनारे स्वच्छतेची मोहीम राबवतो. त्याने बीच स्वच्छ करतानाचे काही फोटो फेसबुकवर टाकले की, त्याला हजारो लाईक्‍स मिळतात. त्या लाईक्‍स करणाऱ्यांना वाटतं लाईक्‍स केल्याने जणू त्यांनीच स्वच्छता केलीय किंवा लाईक केलं की आपली जबाबदारी संपली; पण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही स्वत: रस्त्यावर उतरून काम करणारे आहात. ‘यिन’ तुम्हाला तशीच शिकवण देते.

तुम्हाला जे मनापासून करावसं वाटतं तेच करा; पण हेही लक्षात ठेवा की, आई-वडिलांना आपल्या भल्याची चिंता असते म्हणून त्यांचे काही आग्रह असतात.  आपल्या आई-वडिलांच्या काळात डॉक्‍टर, इंजिनिअरिंगला महत्त्व होतं म्हणून ते आजही डॉक्‍टर, इंजिनिअर होण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या आई-वडिलांच्या काळात सरकारी नोकरीचं महत्त्व होतं म्हणून त्यांनीही तसा आग्रह धरला असेल. त्यामुळे त्यांना समजून घ्या आणि त्यांना तुम्हाला काय करायचं ते समजून सांगा. प्रेमाने सांगा ते ऐकतील. मला अभ्यासाची नाही परीक्षेची भीती वाटायची. कारण, माझ्यावर ‘नापास’ असा शिक्‍का बसला होता. मी अभ्यासात हुशार नव्हतो. मी वर्गात शेवटच्या बाकावर असे, नाहीतर वर्गाबाहेर तरी. माझ्या शिक्षकांसाठी सर्वांत नालायक होतो मी; पण सिस्टीमने माझ्यासारख्या नालायकाला सुधारण्यासाठी काम करायला हवं होतं; पण ते झालं नाही. माझ्या उदाहरणावरून सांगतो, अपयशामुळे कधी नाराज होऊ नका. 

परीक्षेत गुण कमी मिळाल्याने काहीच बिघडत नाही. करिअर करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी या कशाचीच गरज नसते.  आपण भारतीय खूप घाबरट असतो. मार्क्‍स कमी मिळाले तर काय, नोकरी गेली तर काय, पैसे कमवले नाही तर काय, असाच विचार करत राहतो. तुमची पिढी मात्र घाबरट नाही. मनस्वी आहे. त्यामुळे मनातलं मनात ठेवून तुम्ही फक्त इतरांचंच नाही ऐकणार. पालकांनी तुम्हाला चांगली मूल्यात्मक शिकवण दिली असेल तर तुम्ही तुमच्या मनाने जे काही कराल ते चांगलंच असेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com