दिल्ली ते गल्ली आता एकच सरकार 

निखिल पंडितराव
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. नवे बदल होत आहेत. नव्या क्रांतीचे पर्व सुरू झाले असून शेतकरी हाच या क्रांतिपर्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हाच कणा मानून विकासाची रचना केली जात आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनांची केवळ घोषणा करत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीवर भर देत आहे. त्यासाठी रस्ते, पाणी, वीज अशा पायाभूत व मूलभूत सुविधा ग्रामीण भागात पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकातील व्यक्तीच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच वाटचाल सुरू केली आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. नवे बदल होत आहेत. नव्या क्रांतीचे पर्व सुरू झाले असून शेतकरी हाच या क्रांतिपर्वाचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी हाच कणा मानून विकासाची रचना केली जात आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजनांची केवळ घोषणा करत नाही तर त्यांच्या अंमलबजावणीवर भर देत आहे. त्यासाठी रस्ते, पाणी, वीज अशा पायाभूत व मूलभूत सुविधा ग्रामीण भागात पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक घटकातील व्यक्तीच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच वाटचाल सुरू केली आहे. नव्या विकासक्रांतीच्या या योजनेत लोकसहभाग आहेच; त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजप व मित्रपक्षांचा उमेदवारच विजयी होईल, असा विश्‍वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘आपली अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी, शेती हाच या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी व शेती जगली तरच देश पुढे जाऊ शकतो. त्यासाठी दोन वर्षांपासून बळिराजाला सक्षम बनविण्यासाठी विविध योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केल्या. योजनांची केवळ घोषणा नाही, तर नवी क्रांती आणण्यासाठी त्यांच्या अंमलबजावणीवरही भर दिला. जलयुक्त शिवारातून महाराष्ट्र दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग लक्षणीय आहे. ३४२२ कोटी रुपयांच्या शासन निधीतून ११.६४ लाख हेक्‍टर शेती सिंचनाखाली आली आहे. यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा लोकसहभाग आहे. लोकांनाच शाश्‍वत सिंचनाची बाब पटली आहे. मागेल त्याला शेततळ्यातून ५२ हजार शेततळी साकार झाली आहेत. विजेअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा सुरू केला. कृषी फिडरला सौर ऊर्जेची जोड दिली. प्रधानमंत्री उजाला योजनेत राज्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला. पूर्वीच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे कोळशाचा प्रश्‍न निर्माण झाला; परंतु आपल्या सरकारने भ्रष्टाचारमुक्त कोळसा वितरित करण्यास सुरवात केल्याने वीजनिर्मितीत वाढ झाली. पीककर्ज विमाही मोठ्या प्रमाणात सुरू केला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कामच आम्ही जनतेचे सेवक बनून करत आहोत.’’

विविध कल्याणकारी योजनांना प्रारंभ
श्री. पाटील म्हणाले, ‘‘तळागाळातील नागरिक केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. एक उद्योग उभा राहिला तर स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. तसेच काही जणांकडे कौशल्य असते; परंतु निधीअभावी उद्योग सुरू करता येत नाही. या सगळ्यांचा विचार करून ‘मुद्रा लोन’ योजनेची सुरवात केली आणि रोजगाराच्या अनेक संधी आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जनधन योजना, पंतप्रधान विमा योजना अशा कल्याणकारी योजना सुरू केल्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना ही तर अनेकांसाठी जीवन देणारीच योजना आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २५ हजार ७७४ शाळा डिजिटल केल्या आहेत. सर्वसामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण मिळण्यासाठी राजर्षी शाहूंच्या नावाने शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली आणि आज शाहूंचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकारण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. 

डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतून अल्पभूधारक आणि नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक लाभ देण्यात येत आहे. नव्या ज्ञानक्रांतीसाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. नॉनक्रिमीलियरची मर्यादा साडेचार लाखांवरून सहा लाखांवर केल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. इंदू मिलवरील बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेले लंडनमधील घर खरेदी करून आम्ही आमची अस्मिता जपण्याचे काम केले आहे.’’

शिव स्मारकाच्या कामास प्रारंभ
मुंबईजवळ समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू झाले आहे. ते उभारणार असल्याची केवळ घोषणा नाही तर कृती करून दाखविली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊनच ग्रामीण भागातील जनतेचा विकास साधला जाणार आहे, असे मानून काम सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘महिलाशक्तीची ताकद वाढण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतून महिलांसाठी प्रगतीची कवाडे खुली झाली आहेत. गर्भवती महिलांना चांगला आहार मिळावा म्हणून ६ हजार रुपयांचे अनुदान सुरू केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, मागास भागात उद्योग, मेक इन इंडिया अशा अनेक विकासाच्या योजना सुरू असून त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होत आहे. दिल्लीपासून ग्रामीण भागातील पंचायतीपर्यंत एकच सरकार असल्यास त्याचा निश्‍चित फायदा विकास साधण्यास होतो. यासाठी आता दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपचेच सरकार असणार यावर आमचा विश्‍वास आहे.’’ ग्रामीण भागातील जनता आता गतवेळेच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ पोकळ आश्‍वासनांना भुलेल असे वाटत नाही. जनता सुज्ञ असून विकासाच्या नव्या पर्वासाठी भाजपलाच साथ देईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

भाकरी परतवण्याची हीच वेळ 
दहा वर्षांपासून देशात व राज्यात असलेल्या सरकारला जनतेने बाजूला केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास दाखवत भाजप सरकारला साथ दिली. केंद्राप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करून दाखवत आहे. महापालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही आतापर्यंत भाजपला जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गट-तटात अडकून विकासापासून वंचित राहण्यापेक्षा विकासाला साथ देण्यासाठी भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना साथ मिळेल. भाकरी परतवण्याची हीच खरी वेळ असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: chnadrakant patil interview