बंडखोरीच्या रूपाने खदखद आली बाहेर

बंडखोरीच्या रूपाने खदखद आली बाहेर

सोलापूर - पक्षनिष्ठा... पक्षात ज्येष्ठांना आता किंमत उरली नाही... आम्हाला डावललं... नवखे शिरजोर ठरलेत... आम्ही पक्ष वाढवलं अन हे आलेत आता आम्हाला शिकवायला... असे काहीसे संवाद गेल्या दोन दिवसांपासून कानावर येत होते. अन अखेर यातून व्हायचे तेच झाले. प्रमुख पक्षातील खदखद अखेर बंडखोरीच्या रूपाने बाहेर आली.

पार्टी वीथ डिफ्रन्ट असलेला व सत्तेचे डोहाळे लागलेल्या शिस्तबद्ध भाजपासून ते काँग्रेस पर्यंत प्रमुख  पक्षात बंडखोरांचे पीक उदंड झाले. याचा परिणम पक्षाच्या अधिकृत उमेदवारावर होणार आहे.

निम्या प्रभागांत बंडखोरांचे आव्हान
महापालिका निवडणुकीत जवळपास निम्या प्रभागांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांचे आव्हान निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक १३ व १६ मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी कुणाला पुरस्कृत करायचे याबाबतची खलबते पक्षात सुरू झाली आहेत. 

केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडे शिस्तबद्ध पक्ष म्हणून पाहिले जाते. मात्र, महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त झाल्यामुळे या पक्षालाही बेशिस्तीची लागण झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीही अनेक इच्छुकांनी अर्ज कायम ठेवल्यामुळे पक्षातील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपमध्ये प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, आठ, नऊ, १२, १३, १५, १६, २०, २१, २२, २५, २६ या प्रभागांमधील उमेदवारांमसोमर बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे. पक्षाकडे इच्छुक म्हणून उमेदवारीची मागणी या प्रभागातील काही कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, त्याठिकाणी पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. या प्रभागामध्ये आपली उमेदवारी कायम ठेवून त्याचा फटका भाजपला कशा पद्धतीने बसेल याची व्यूहरचना करण्याचे काम या इच्छुकांकडून चालू झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोरीचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. काही प्रभागांमध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये सहा, चार, पाचमध्ये तीन, आठ, १२, १३ व २१ मध्ये दोन, ९, २०, २५, २६, १५, २२ मध्ये एक, १६ मध्ये चार अशा जवळपास ३० बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिकृत उमेदवारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर पक्षाकडून काय तोडगा काढला जाणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

विद्यमान नगरसेवकांत लढाई
प्रभाग क्रमांक तीन क मध्ये भाजपमध्ये विद्यमान नगरसेविका अंबिका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्याच विद्यमान नगरसेविका इंदिरा कुडक्‍याल यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवून आव्हान निर्माण केले आहे. या विद्यमान नगरसेविकांपैकी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर २३ फेब्रुवारीला शिक्कामोर्तब होईल. याच प्रभागात विद्यमान नगरसेविका सुवर्णा हिरेमठ यांनी विजयालक्ष्मी गड्डम या पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान दिले आहे. प्रभाग १६ क मध्ये पक्षाकडे उमेदवारच नाही.

छुप्या बंडखोरीचे प्रमाण अधिक

महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातील काहींनी उघड बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारीही दाखल केली आहे. परंतु, पक्षनिष्ठा म्हणा किंवा पर्यायाचा अभाव म्हणा, शिवसेनेत उघड बंडखोरीपेक्षा छुप्या बंडखोरीचे प्रमाण अधिक असण्याची शक्‍यता आहे.

जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी तिकीट वाटप केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींनी उघड तर काहींनी खासगीत नाराजी व्यक्त केली. ही शिवसेना नसून कोठेसेना असल्याची टीकाही झाली. याचा पुढील टप्पा म्हणून अस्मिता गायकवाड यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या उमेदवार नम्रता निंबाळकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली. माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या पुतण्यास उमेदवारी नाकारल्याने त्यांनी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर श्रावण भवर यांनीही शिवसेनेला पाठिंबा असणारच परंतु कोठेसेनेला मात्र विरोधच करणार अशी भूमिका घेतली आहे.

राज्यात दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहे. सोलापुरातही शिवसेनेने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा शिवसेनेतच राहण्याला अनेकांची पसंती असणार आहे. त्यामुळेच कदाचित शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत तुलनेने कमी प्रमाणात उघड बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक शिवसैनिकांच्या छुप्या बंडखोरीमुळे होणारे पक्षाचे नुकसान मोठे असणार आहे. अर्थातच कोणत्या प्रभागातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली, या आकडेवारीबरोबरच कोणी पक्षाचे काम केले आणि कोणी गद्दारी केली हेही समोर येणार आहे. या नाराज मंडळींच्या उपद्रवमूल्यावर शिवसेनेचे संबंधित प्रभागातील यशापयश अवलंबून असणार आहे.

अद्यापही आशा
भविष्यकाळात महामंडळाचे सदस्यत्व, पक्षाचे मोठे पद देण्याचा शब्द मिळाला किंवा वरिष्ठ पातळीवरून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला तर निश्‍चितपणे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करू असा पवित्रा छुप्या बंडखोर शिवसैनिकांनी घेतला आहे.

अंतर्गत राजकारणातून झाला उमेदवारीचा पत्ता कट
सोलापूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पीरअहमद शेख व नगरसेविका निर्मला जाधव यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीला एकीकडे उमेदवारांची चणचण जाणवत असताना दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांनाच उमेदवारीतून डावलण्यात आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

२०१२च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे १६ नगरसेवक विजयी झाले. त्यापैकी शांता दुधाळ व किशोर माडे यांनी उमेदवारीसाठी इच्छाच व्यक्त केली नाही. सुनीता कारंडे यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. पीरअहमद शेख व निर्मला जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उर्वरित विद्यमान ११ नगरसेवकांना सोलापूर शहर राष्ट्रवादीने महापालिकेच्या मैदानात उतरविले आहे. 

निर्मला जाधव प्रभाग २२ ‘क’ सर्वसाधारण महिला या मतदारसंघातून अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. त्यांना शिट्टी चिन्ह मिळाले असून त्यांची लढत राष्ट्रवादीच्या सुवर्णा जाधव, शिवसेनेच्या अनिता बुक्कानुरे, रिपाइंच्या कृष्णाबाई गायकवाड, भाजपच्या निर्मला गायकवाड, काँग्रेसच्या अश्‍विनी जाधव, मनसेच्या रेखा साळुंके यांच्यासोबत होणार आहे. 

पीरअहमद शेख प्रभाग १४ ‘ड’मधून सर्वसाधारण जागेवर अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावत आहेत. त्यांना इस्त्री चिन्ह मिळाले असून त्यांचा सामना राष्ट्रवादीचे मुदस्सर इनामदार, माकपचे युसूफ शेख, भाजपचे अविनाश कुर्ले, शिवसेनेचे खालिद चंडरकी, एमआयएमचे रियाज खरादी, काँग्रेसचे मकबूलसो मोहोळकर, बहुजन विकास आघाडीचे शिवा केशपागलू, अपक्ष उमेदवार शिवाजी वाघमोडे, गंगाधर साठे, विशाल लोंढे यांच्यासोबत होणार आहे.

आठवलेंना थांबविण्यात अपयश
मधुकर आठवले हे सलग पाच टर्म नगरसेवकपदाची संधी मिळालेले कार्यकर्ते. यंदा ते पुन्हा उत्सुक होते. त्यांच्याप्रमाणेच संजय हेमगड्डी, महापौर प्रा. सुशीला आबुटे हेही इच्छुक होते. पैकी हेमगड्डी आणि प्रा. आबुटे यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले. मात्र, काँग्रेसशी एकनिष्ठ राहूनही आठवलेंना उमेदवारी मिळाली नाही. 

आठवले यांनी उमेदवारी दाखल केली, मात्र ते ऐनवेळी काढून घेतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. याच प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक पैगंबर शेख यांनी उमेदवारी काढून घेतली, आठवले मात्र कायम राहिले. त्यांना संपर्क साधण्याचा श्रेष्ठींनी वारंवार प्रयत्न केला, मात्र सकाळी अकरापासूनच त्यांचा मोबाईल ‘आऊट ऑफ कव्हरेज’ लागला. श्री. आठवले यांच्यासह सुमारे ३० ते ३५ जणांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली होती. मात्र, आठवले वगळता इतर सर्वांनी माघार घेतली.

खुली जागा असतानाही त्या ठिकाणी रुखसाना शेख या महिलेला उमेदवारी दिल्याने आठवले यांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

भाजप व एमआयएमकडून लढणाऱ्या चौघांचे रिपाइंतून निलंबन
भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या तिघांची तर एमआयएमकडून निवडणूक लढविणाऱ्या एकाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून (आठवले गट) निलंबन करण्यात असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी दिली.

रिपाइंने मुंबईत भाजपशी युती केली आहे. अन्य महापालिका निवडणुकीत रिपाइं स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये रिपाइंचा युतीचा प्रस्ताव भाजपने ताटकळत ठेवत शेवटीही उत्तर दिले नाही. यामुळे युती होऊ शकली नाही. रिपाइंचे तीन उमेदवार परस्पर निर्णय घेत कमळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. अशा तिघांना पक्षातून निलंबित केले आहे. यामध्ये रवींद्र गायकवाड, प्रा. नारायण बनसोडे, वंदना गायकवाड यांचा समावेश आहे. यासोबतच एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या शिल्पा निकंबे यांचेसुद्धा पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये रिपाइं भाजपसोबत युती करणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र मित्रपक्ष भाजपच्या कमळ चिन्हावरून रिपाइंच्या उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, तसे केल्यास पक्षातून निलंबित करण्यात येईल, असा ठराव लोणावळा येथे १६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार हे निलंबन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार हे निलंबन करण्यात येत असल्याचे राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com