आमच्या मुलांच्या शिक्षणाचे काय? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

रेठरे बुद्रुक - मागील वर्षीच्या ऊसतोडीतून मिळालेले पैसे सहा महिने बसून खाल्ले. आता पुन्हा सहा महिने कमवायचे. हातात रुपाया तर शिल्लक नाही. मुलाबाळांनी खायचे काय? त्यांना शिक्षण कसे द्यावे? आमची अशी ही भटकंती सुरू असते. तेव्हा शासनाने आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी काही ठोस पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा आवळवाडी (ता. शिरूर-कासार, जि. बीड) येथील 70 वर्षांच्या ऊसतोडणी मजूर बायजाबाई सानप यांनी व्यक्त केली. 

येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मजुरांचे नुकतेच आगमन झाले आहे. त्यांच्या मुक्कामाच्या तळावर राहुट्या उभारणीची कामे सुरू आहेत. गेल्या 40 वर्षांपासून तोडणीसाठी येणाऱ्या बायजाबाई राहुटीमधील निवासाच्या जागेवर शेणकाला टाकत होत्या. अंगण स्वच्छ करतच त्यांनी संवाद साधला. आमचे दहा जणांचे कुटुंब. मी आणि माझे मालक एक ऊसवाहतूक गाडी चालवतो. भाऊसाहेब आणि परशराम या दोघा मुलांच्याही 25 वर्षांपासून आमच्या बरोबरीने गाड्या आहेत. त्यांचे शिक्षण जेमतेम आहे; पण आमच्याबरोबरच त्यांना या व्यवसायात आणले आहे. परवा सणाच्यादिशीच आम्ही इकडे आलो. गावाकडे अतिपावसाने बाजरी वाया गेली. इकडे कामाला आले की लेकरे कुणाजवळ टाकायची म्हणून मग त्यांना बरोबरच घेवून यावे लागते. त्यांच्या शिक्षणाची शासनाने ठोस व्यवस्था करावी, अशी आमची अपेक्षा आहे. 

दरम्यान, तळावर हंगामी गाव उभे करण्यासाठी बायाबापडी मंडळी धडपडत होती. एक- दोन दिवसात निवासाची सोय उरकेल. आता कारखाना कधी सुरू होतोय, याचीच त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.