नगर गारठला; पुण्यात चाहूल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - आकाश निरभ्र असल्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी (विशेषकरून मध्य महाराष्ट्रात) हुडहुडी भरविणारी थंडी जाणवू लागली आहे. नगरमध्ये शुक्रवारी 10 अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 11.7 अंश सेल्सिअसची नोंद झाली असून, थंडीची लाट पसरण्यास काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चांगलीच घट झाल्याचे दिसून आले. साधारणपणे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच आणि त्यापेक्षा अधिक अंश सेल्सिअसने तफावत जाणवल्यास त्याला थंडीची लाट म्हणता येते. राज्यात ही लाट अद्याप आलेली नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आले. नगरमधील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल सात अंश सेल्सिअस इतकी तफावत जाणवल्याने नगरवासीयांनी शुक्रवारी थंडीच्या लाटेची अनुभूती घेतली. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे दिसून आले. येत्या मंगळवारपासून (ता. 8) थंडीमध्ये वाढ होण्याची शक्‍यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून, हुडहुडी भरविणाऱ्या या थंडीपासून बचाव करण्यासाठी पुणेकरांनी ऊबदार कपडे घालण्यास सुरवात केली. रात्री साधारणत: आठ वाजल्यापासून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. 

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. नगरपाठोपाठ नाशिकमध्ये 11.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सरासरीच्या तापमानात सात; तर पुणे, सोलापूर, सांताक्रूझ, रत्नागिरी, उस्मानाबाद येथे प्रत्येकी जवळपास चार अंश सेल्सिअस तफावत असल्याचे निदर्शनास आले. 

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 
जळगाव (14.2), महाबळेश्‍वर (13.9), नाशिक (11.1), सातारा (13.4), मुंबई (23), उस्मानाबाद (13.4), परभणी (16.6), वर्धा (16.8), यवतमाळ (14.8) 

Web Title: lowest temperature of 10 degrees Celsius in the state

टॅग्स