कृषी परिवर्तनासाठी शरद जोशी यांचे विचार महत्त्वाचे - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पुणे - ""आजही पासष्ट टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान वीस टक्के एवढे अल्प आहे. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात परिवर्तन करावयाचे असेल, तर शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांचे विचार अंगीकारले पाहिजेत,'' असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. 

पुणे - ""आजही पासष्ट टक्के नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान वीस टक्के एवढे अल्प आहे. त्यामुळे ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात परिवर्तन करावयाचे असेल, तर शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांचे विचार अंगीकारले पाहिजेत,'' असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. 

वसुंधरा काशीकर- भागवत यांनी लिहिलेल्या "शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री मंत्री गिरीश बापट, माजी आमदार सरोज काशीकर, लेखक राजीव साने, राजहंस प्रकाशनाच्या संपादक विनया खडपेकर आदी उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, ""शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल, या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. शेतीसाठी खुली अर्थव्यवस्था तारक की मारक? या दृष्टीने अनेक चर्चाही झाल्या. शरद जोशी यांनी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारकच ठरेल, अशी ठाम भूमिका घेतली. त्यावर अमेरिकेचे हस्तक असा आरोपही त्यांच्यावर झाला. परंतु खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. तेव्हा मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना सर्वसामान्य आणि गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवला पाहिजे.'' 

शरद जोशी यांच्या विचारांचा मी पाईक आहे. त्यांचे विचार जात धर्म, भाषा आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना भिडले, असे सांगून गडकरी म्हणाले, ""जोशी यांच्या विद्वतेला व्यावहारिक अनुभवांची जोड होती. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांशी ते अनुभवाने जोडले होते. कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेचे त्यांनी केलेले चिंतन खूप महत्त्वाचे आहे.'' खुर्चीत ज्याचा जीव अडकलेला नाही, तो सत्य बोलायला घाबरत नाही. मंत्री राहिला म्हणून कोणी मरत नाही, असेही ते म्हणाले. 

या वेळी बापट, सरोज काशीकर, साने यांची भाषणे झाली. वसुंधरा काशीकर यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले, तर भक्ती हुबळीकर यांनी आभार मानले. 

आज देशापुढे विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यतेचा मोठा प्रश्‍न आहे. डावा- उजवा असे काही राहिलेले नाही. जो सत्तेत त्याचा झेंडा हातात, ही प्रवृत्ती वाढत असून राजकारणात हौशे- नवसे- गवसे यांची संख्या वाढत आहे. त्यापैकी काही टिकतात. काही परत निघून जातात; तर काहींना विनोबा भावे, महात्मा गांधी व्हायचे असते. सगळ्याच चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज नाही. त्यांनी बाहेर राहून राजकारणावर दबाव ठेवावा. 
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री