महामानवाची रसिकता

महामानवाची रसिकता

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत आदराने आणि सन्मानाने गौरवलं गेलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बौद्ध धर्माचे प्रवर्तक म्हणून त्यांचं नाव आदरानं घेतलं जातंच. पण व्यासंगी विद्वान म्हणून त्यांचा लौकिक त्यांच्या सर्वच क्षेत्रातल्या यशस्वी कतृत्वाने सिद्ध होतो. सखोल अभ्यास, अखंड चिंतन, विशाल दूरदृष्टी, मोठं सुजाण समाजभान आणि जाज्वल्य स्वाभिमान असणाऱ्या बाबासाहेबांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सगळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी केली.

समाजाला जागवण्यासाठी भाषणं, वृत्तपत्र लेखन, सत्याग्रह या माध्यमांतून प्रबोधन करत जीव ओतला आणि सर्व पातळ्यांवर लढत माणसाला माणूसपण मिळवून दिलं. त्यांचा स्वाभिमान जागृत केला. ही रक्तविरहित लढाई त्यांनी बुद्धिवादांनी आणि समाजाला संघटित करून केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांनी तरुणांना दिलेला सल्ला त्यांच्या सुत्राशी सुसंगत होता. गौर वर्ण, रुंद कपाळ, राजबिंडा देह, धिप्पाड शरीरयष्टी, रुबाबदार वागणं असलेलं बाबासाहेबांचं व्यक्तिमत्त्व अतिशय रसिकवृत्तीचं होतं. समाजात वावरताना आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांनी रसिकता आग्रहाने जपली. त्यांच्या सहवासातल्या अनेक व्यक्तींनी त्यांच्यासंबंधी सांगितलेल्या आठवणीतून आणि खुद्द बाबासाहेबांच्या कृती-उक्तीतून त्यांचं रसिक मन वारंवार अधोरेखित होतं...

दिल्लीमध्ये रेल्वे शताब्दी वर्षानिमित्त लागलेलं एक प्रदर्शन बघायला रमाई गेल्या असता तिथल्या दुकानातला एक हत्ती त्यांना खूप आवडला. बैठक खोलीत ठेवण्यासाठी म्हणून त्यांना तो हवा होता. बाबासाहेबांनाही इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा म्हणून हत्ती आवडायचा. त्यांनी तो सहकारी वामनराव गोडबोले यांना विकत आणण्याविषयी सांगितलं. दीड फूट उंचीचा सोन्याच्या अंबारीने सजवलेला तो आकर्षक हत्ती म्हणजे अप्रतिम कलाकृती होती. पण चौकशीअंती कळलं की, म्हैसूरच्या महाराजांनी तो राष्ट्रपतीभवनासाठी भेट म्हणून पाठवला आहे. म्हैसूरचे महाराज बाबासाहेबांचे मित्र होते. त्यांनी त्यांच्याकडून तसाच दुसरा हत्ती बनवून घेतला. त्यानंतर हत्ती कसा हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे, हे ते सर्वांना पुढे तासभर सांगत होते. बाबासाहेबांनी पक्षाचे बोधचिन्ह हत्ती का ठेवलं? हे त्यावरून समजतं. आकाशाचा रंग निळा असतो आणि आकाश सर्वदूर पसरलेलं असतं, तसा आपला पक्ष भारतभत पसरावा ही रसिक दूरदृष्टी. म्हणून त्यांनी ध्वजाचा रंग निळा निश्‍चित केला.

बाबासाहेबांना बागकामाची खूप आवड होती. कामातून जेव्हा उसंत मिळेल तेव्हा ते बंगल्यासमोरील बागेत खुर्च्या टाकून बसत. १, लेडी हार्डिंग एव्हेन्यू या बंगल्यासमोरची बाग त्यांनी खूप सुटसुटीत, आकर्षक केली होती. निवांतपणा मिळाला की ते बंगल्याच्या पाठीमागची बाग फुलवत. त्या बागेत सहकाऱ्यांच्या मदतीने नवनवीन सुगंधित फुलांची झाडे लावत. आंब्याची, चिकूची, नारळाची, कलमं, रोपटी लावत, बागकाम हा त्यांचा आवडता छंदच होता. महाविद्यालयाच्या बागेत फेरफटका मारण्यासाठी ते आले की इथे हे झाड लाव, तिथे अमक्‍या फुलाचे झाड लाव अशा सूचना देत. मधुमेह असल्याने त्यांना संत्र खाण्यास डॉक्‍टरांनी सांगितलं. म्हणून त्याचंही झाड लावावं, असं त्यांनी आग्रहाने सांगितलं. बागेमध्ये ते खूप रमायचे.

आंबेडकरांना चित्रकला आवडायची. कुलाब्याला जयराज भवन इथं दोन खोल्या भाड्याने घेऊन आंबेडकर राहत होते. तिथे त्यांनी आपली ही आवड विकसित केली. ज्या बोटांनी देशाची राज्यघटना लिहिली, उत्तमोत्तम ग्रंथ लिहिले ती बोटं चित्र रेखाटतानाही तितकीच रमून जात. त्यांच्या चित्राच्या अनेक वह्या होत्या. अगदी कावळा, चिमणी, बदक, हरीण, पिंपळाचे झाड, नारळाचे झाड अशा चित्रांपासून ते रंगवण्याचे अनेक प्रकारचे ब्रश, पेंटिंग पेपर, वेगवेगळे रंग कलरट्यूब आणि काही पेन्सिली असं चित्र काढण्याचं आणि रंगवण्याचं सामान खोलीभर असायचं. बुद्धाच्या अनेक मूर्ती आणि फोटो त्यांनी पाहिले होते. पण त्यांच्या डोळ्यासमोर आणि मनःपटलावर असलेल्या बुद्धाची प्रतिमा साकारण्यासाठी ते वयाच्या चौसष्टाव्या वर्षी चित्रकला शिकण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत सफाईदारपणानं पण तितक्‍याच कुशलतेने ते चित्र काढत. २२ लक्षणं असलेले चित्र स्वतःच्या कल्पनेतून साकारावं म्हणून या महामानवानं रंगाचा ब्रश घेऊन चित्रकला शिकली. स्टॅंडवरचे बुद्धाचे चित्र केवळ बोटांनी नाही तर मनानं रेखाटलं होतं. ते प्रत्येक चित्राखाली सही करून तारीख घालत. बाबासाहेबांना फोटो काढून घेण्याची विशेष आवड होती. निपाणीला सभेसाठी गेले असता ते राहात असलेल्या डाक बंगल्याशेजारी झाडाखाली एक घोडा उभा होता. बाबासाहेब घोड्यावर बसले आणि छान पोज देऊन फोटो काढून घेतला. एकदा मिलिंद महाविद्यालयाच्या बागेची पाहणी करताना त्यांनी अचानक फोटोग्राफला बोलवा असं सांगितलं आणि आजूबाजूला लोक बागकाम करत असताना मध्ये एका खुर्चीत बसून फोटो काढले. तेवढ्यात तिथे उभ्या असलेल्या नरवडे मिस्त्रींच्या हातात छत्री दिसली. मग छत्री वर धरायला सांगून फोटो कोढण्यासाठी पोज दिली. 

बाबासाहेब कपड्यांचे फार मोठे शौकिन होते. त्यांना नानाविध आणि चांगले पोषाख वापरण्याची आवड होती. ते मंत्रिमंडळात असताना लोकसभेतले खासदार आणि त्यांचे मित्र त्यांचा एकेक पोषाख बघून आश्‍चर्यचकित होत. दीक्षा सोहळ्यासाठी पांढराशुभ्र लांब कोट आणि पांढरा सदरा दिल्लीहून शिवून आणला होता आणि पांढरेशुभ्र रेशमी धोतर कोईमतूरहून मागवून घेतलं होतं.

एकदा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईत आले होते. प्रचारसभा झेविअरच्या मैदानावर परळला होती. बाबासाहेब तयारीला लागले. त्यांनी ग्रे कलरचा छान सूट घातला. रमाईंनी टायसाठी समोर टायने भरलेली बॅग ठेवली. पण त्यांना त्यांच्याकडचा एकही टाय पसंत पडेना. शेवटी सभेला जाताना चर्चगेटला इरॉस सिनेमागृहाच्या मागे उच्च प्रतीच्या सुटस्‌चं शोरूम होतं. तिथे परदेशस्थ आणि उच्चभ्रू लोक खरेदीसाठी जात. बाबासाहेबांनी उच्च प्रतीचे पाच-सात टाय घेतले. एक टाय तिथेच सुटावर बांधला आणि सभास्थळी निघाले. राजगृहात वरच्या मजल्यावरची अख्खी मोठी खोली बाबासाहेबांच्या पोषाखांनी भरलेली होती. 

क्रिकेट तर त्यांचा जीव की प्राण असलेला खेळ होता. कारण लहानपणी ते नेहमीच क्रिकेट खेळायचे. त्यांच्या टीमचे लहानपणी ते कॅप्टनही होते. संगीत रसिकतेने ऐकणाऱ्या बाबासाहेबांना वेगवेगळ्या प्रकारची पेनं आणि घड्याळे वापरण्याची आवड होती. इतकंच नाही तर त्यांच्याकडे अनेक प्रकारचे आणि आकारांचे बूट, सपाता होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या हॅट होत्या. ते तबला छान वाजवत. नंतरच्या काळात त्यांना आधारासाठी काठी लागे. त्यावेळी दीक्षा समारंभासाठी त्यांनी खास काठी पसंत केली होती. बाबासाहेब ज्या शहरात, गावात जात तिथल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची त्यांची आवड होती.

खाण्या-पिण्यातही त्यांच्या आवडी विशेष होत्या. कोंबडीचं कालवण, सुक्‍या बोंबलाची चटणी त्यांना फार आवडायची. १९४८ दरम्यान तब्येत बरी नसल्याने ते विश्रांती आणि हवापालटासाठी नाशिकला गेले. काथरगावला, काथरनदी आणि गंगेचा संगम होतो. तिथले मासे अतिशय रुचकर. ते बाबासाहेबांना फार आवडायचे. भुईमुगाच्या मीठ घालून शिजवलेल्या ओल्या शेंगा त्यांना आवडायच्या. ते स्वतः कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन उत्तम खीर करत. बाबासाहेबांचे उच्च शिक्षण विलायतेला झाल्याने त्यांच्या वागण्यात विलायती शिष्टाचार सहज जाणवत. डायनिंग टेबल, काटे-चमचे, वेगवेगळे टॉवेल्स यांना त्यांची विशेष पसंती असे. जेवणानंतर फलाहारात विशेषत्त्वानं संत्री त्यांना खूप आवडायची.

नाटक पाहण्याची बाबासाहेबांना आवड होती. औरंगाबादला ‘युगयात्री’ नाटकाचा प्रयोग पाहताना ते इतके रमले आणि प्रभावित झाले, की त्यांनी लेखक, कलाकारांचं कौतुक केलंच. पण त्यांच्यासोबत फोटोही काढला.

बाबासाहेबांची पुस्तकांची आवड तर सर्वश्रृत आहे. हा महामानव नेहमी ग्रंथात मग्न असायचा. लिहिण्या-वाचण्याशिवाय माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? असं ते म्हणायचे. घटना लिहिण्याच्या कामात ते २४ तासांपैकी २० तास टेबलावर असायचे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक विषयांवरील पुस्तकं त्यांना अनमोल वाटायची. राजगृहात राहायला यायचं ठरल्यावर सामान आणलं. त्यामध्ये एकापाठोपाठ एक ट्रंकांनी नुसती मोठमोठी पुस्तकं आणि ग्रंथच बंगल्यावर आले. १०-१२ लोक नुसते कपाटात ग्रंथच लावत होते. बंगला माणसाच्या निवाऱ्यासाठी का पुस्तकांसाठी हेच कळत नव्हतं. राजगृहाचा वरचा अख्खा मजला पुस्तकांच्या कपाटांनी सजवला गेला. संसाराचं सामान फक्त ट्रंकभर होतं.

बाबासाहेबांनी आपल्या आवडीनुसार स्वच्छतागृह, शयनगृह, स्नानगृह, अभ्यासिका, ग्रंथालय करवून आणि सजवून घेतलं होतं. शिक्षणाच्या काळातही शिष्यवृत्तीत बचत करून ते पुस्तकं विकत घ्यायचे. स्वदेशी परत येताना त्यांच्याजवळ चार-पाच हजार ग्रंथांचा समूह होता. लंडनहून प्रकाशित होणाऱ्या एका इंग्लिश दैनिकाच्या संपादकाने त्यांची मुलाखत घेताना त्यांना प्रश्‍न विचारला, ‘डॉ. आंबेडकर या संपूर्ण देशात आपल्याइतकं वाचन केलेली आणि अनेक क्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास केलेली व्यक्ती दुसरी नाही, आपण किती ज्ञान संपादन केलं असं वाटतं? बाबा म्हणाले, ‘ज्ञान महासागरासारखं आहे. या ज्ञानरूपी महासागरात मी दोन थेंबसुद्धा प्राशू शकलो नाही. हे दुर्दैव आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत ज्ञानाची तहान पूर्ण झालीच नाही.’

प्रचंड बुद्धिमत्ता, वाक्‌चातुर्य असलेल्या आंबेडकरांनी परिवर्तन आणि बदलाची आमूलाग्र क्रांती केली. आंबेडकरांचं हे असं विविधांगी आणि संपन्न व्यक्तिमत्त्व रसिक वृत्तीचं होतं. आपला कामाचा व्याप आणि ध्येय सांभाळताना त्यांनी आपल्या कामातही रसिकता जपली. अत्यंत आवडीने मनापासून केलेल्या कर्तव्याचा, कर्तृत्वाचा, लेखाजोखा मांडताना त्यांच्या रसिकवृत्तीनं त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होतो हे निश्‍चित. अखंड दौरे, सभा, लेखन भेटायला येणाऱ्या माणसांचा ओघ यामधून जमेल तशी रसिकता जपण्यास प्राधान्य देणाऱ्या या युगपुरुषाला भावपूर्ण वंदन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com