राज्यातील पहिला ‘डिजिटल’ जिल्हा नागपूर - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

नागपूर - राज्यात प्रथम डिजिटल जिल्हा होण्याचा मान नागपूरला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरला डिजिटल जिल्हा झाल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. जिल्ह्यात प्रथम टप्प्यात २५० ग्रामपंचायतमध्ये फायबर ऑप्टिकलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ५२६ ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट सुविधा सुरू करून डिजिटल केल्या. 

राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सर्व ७७६ ग्रामपंचायती डिजिटल झाल्या. यामुळे आता सर्व व्यवहार संगणकांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘पेपरलेस’ कार्यालयाकडे वाटचाल सुरू होणार आहे. यामुळे गैरप्रकारावर आळा घालण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच अधिकारी मकरंद नेटके यांनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे प्रशंसा केली. 

रामटेक तालुक्‍यात डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा
ऑनलाइन सातबारा देण्याची सुविधा लवकरच सर्व तालुक्‍यांत सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाइन सातबारा देण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर रामटेक तालुक्‍यात सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद
मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रामटेक तालुक्‍यातील वेलदा येथील आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि डिजिटल होण्याच्या फायद्याची विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना चांगल्या शिक्षणासोबत विविध माहिती मिळत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्‍यातील डोंगरगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बाजारपेठेतील भावाची माहिती घरबसल्या मिळत असल्याने भाव पाहून मालाची विक्री करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मोबाईलच्या माध्यमातून स्वस्त दरात माल कुठे मिळतो, याची माहिती घेतो, आणि तेथून मालाची खरेदी करतो, असे महिला बचतगटाच्या महिलेने सांगितले.