गोसेखुर्द गैरव्यवहारात 20 जणांवर गुन्हे दाखल 

file photo
file photo

नागपूर - विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत आणि कामांत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी 20 जणांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये तत्कालीन मुख्य अभियंता आणि अधिकारी; तसेच भागीदार कंत्राटदारांच्या फर्मचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश "एसीबी'ला दिले. या प्रकरणात यापूर्वी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मोखाबर्डी उपसा सिंचनप्रकरणी दोन, तर गोसेखुर्दचा डावा कालव्यात एक आणि गोसेखुर्द उजव्या कालव्यावरील घोडाझरी शाखा कालव्याच्या कामात गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाचे कामांच्या निविदा प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढविले. अवैध-निम्न स्तरावर निविदेचे अद्ययावतीकरणास मंजुरी दिली. पूर्वअर्हता अर्जाच्या छाणणीदरम्यान अपात्र कंत्राटदारास गैरमार्गाने पात्र ठरविले; तसेच यशस्वी कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे बयाणा रकमेचे डीडी देऊन निविदा प्रक्रियेदरम्यान संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे एसीबीच्या चौकशीत आढळले होते. 

तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते, विभागीय लेखाधिकारी चंदन. टी. जिभकाटे, अधीक्षक अभियंता डी.डी. पोहेकर, मुख्य अभियंता सो. रा. सूर्यवंशी, कार्यकारी संचालक दे. पा. शिर्के; तसेच मे. एम. जी. भांगडिया नागपूर या फर्मचे आममुखत्यारपत्रधारक फिरदोस खान पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

गोसेखुर्द डावा कालव्याचे मातीकाम आणि बांधकामाचे नियमबाह्य मूल्य वाढविणे, अवैध निविदेस मंजुरी देणे, कंत्राटदाराने जे. व्ही. फर्मचे नावे निविदा अर्ज भरला असताना व त्यांचे जेव्ही फर्मची नोंदणी भागीदारी निबंधक कार्यालयाकडे केलेली नसताना कंत्राटदारास निविदा प्रक्रियेत सहभागी करण्यात आले; तसेच यातील यशस्वी कंत्राटदार मे. आर. बलरामी रेड्डी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे बयाणा रकमेचा डीडी स्वतःच्या बॅंक खात्यातून दिल्याने निविदा प्रक्रियेत संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे आढळून आले. या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता दशरथ बोरीकर, कार्यकारी अभियंता वसंत गोराडे, विभागीय लेखाधिकारी धनराज नंदागवळी, अधीक्षक अभियंता डी. डी. पोहेकर, मुख्य अभियंता सो. रा. सूर्यवंशी, कार्यकारी संचालक रो. मा. लांडगे; तसेच मे. श्रीनिवासा कंस्ट्रक्‍शन कंपनी अँड आर. बलराम रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com