राज्यभरात 14 हजार घरे उभारणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

जमीन खरेदीसाठी 97 कोटींची तरतूद

जमीन खरेदीसाठी 97 कोटींची तरतूद
मुंबई - म्हाडाच्या अर्थसंकल्पाला बुधवारी (ता. 29) प्राधिकरणाच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली. म्हाडाने 405 कोटी 71 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. यात म्हाडाने गृहनिर्माण कार्यक्रम व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यभरात 14 हजार 440 घरे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आवश्‍यक जमिनीच्या खरेदीसाठी 97 कोटी 67 लाखांची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

म्हाडाने सध्याच्या जमिनीवर घरे उभारण्यासह पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर 1596 कोटी 97 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षी सोडतीतील घरांच्या विक्रीतून 655 कोटी वसूल झाले. पुणे, कोकण आणि इतर मंडळांतर्फे यंदा काढण्यात येणाऱ्या सोडतीतील घरांच्या विक्रीतून चार हजार 266 कोटी मिळण्याची अपेक्षा अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे 2016-17 मध्ये मोडकळीस आलेल्या 757 इमारतींची दुरुस्ती झाली असून, पुढील वर्षी 679 इमारतींची दुरुस्ती अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून नागरी दलित वस्ती सुधार योजना, सुशोभीकरण, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंती यावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थींना कर्जावरील व्याजाच्या अनुदानासाठी (सबसिडी) 20 कोटी, तर पंतप्रधान अनुदान प्रकल्प (पीएमजीपी)अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 25 कोटींची तरतूद आहे.

Web Title: 14000 homes by mhada