राज्यात 30 लाख क्‍विंटल तूर शिल्लक

तात्या लांडगे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सोलापूर - शेतकऱ्यांकडील तूर खरेदीसाठी सरकारतर्फे राज्यभरात 189 हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली; परंतु या केंद्रांची मुदत 18 एप्रिल रोजी संपल्याने तब्बल दोन लाख चार हजार 17 शेतकऱ्यांकडील तूर खरेदी होऊ शकली नाही. त्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी तूर खरेदीसाठी आणखी 15 दिवसांची मुदत जाहीर केली. मात्र, त्याबाबतचे लेखी पत्र नाफेडकडून हमीभाव केंद्रांना प्राप्त झाले नसल्याने तूर खरेदी बंदच आहे. त्यामुळे राज्यात 30 लाख 45 हजार क्‍विंटल तूर शिल्लक राहिली आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीत शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे ऑनलाइन नोंदणी करून त्यांच्याकडील तुरीची माहिती दिली. त्यानुसार राज्यभरातील चार लाख 57 हजार 833 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सुमारे 54 लाख 93 हजार 996 क्‍विंटल तुरीची नोंदणी केली. मात्र, सरकारने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांकडील संपूर्ण तूर खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या राज्यभरातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांकडील 30 लाख 45 हजार क्‍विंटल तुरीची खरेदी होणे बाकी आहे. तुरीसाठी प्रतिक्‍विंटल पाच हजार 450 रुपयांचा हमीभाव दिला जात आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे, अथवा ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांकडील सर्व तूर हमीभाव खरेदी केंद्रांमार्फत खरेदी केली जाईल. त्यासाठी मुदतवाढ मिळाली असून, मंगळवारपासून (ता. 24) खरेदीला प्रारंभ होईल.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

तुरीची स्थिती... (आकडे क्विंटलमध्ये)
54,93,996

तुरीची नोंदणी
30, 45,000 - तुरीची खरेदी बाकी

Web Title: 30 lakh quintal tur balance in state