'भाऊजीं'ना राज्यमंत्रिपदाचा "प्रसाद'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - भाजपवर नाराज असलेल्या शिवसेनेला खूष करण्यासाठी आज राज्य सरकारने सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. आदेश बांदेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि विश्‍वासू सहकारी मानले जातात. त्यातच उद्या (ता. 19) शिवसेनेचा वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्र्यांनी बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देत नाराजीचा सूर मवाळ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने आज शासन निर्णय जाहीर करत सिद्धिविनायक गणपती न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. भाजप व शिवसेनेत कमालीची राजकीय कुरघोडी सुरू असताना या निर्णयाने भाजपने एक पाऊल मागे घेत शिवसेनेचा सन्मान करण्याचे संकेत दिले. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केल्यानंतर पालघर लोकसभा पोटनिवडणूक व विधान परिषद निवडणुकांत दोन्ही पक्षांतील दरी अधिकच रूंदावली आहे. त्यातच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी "मातोश्री'वर भेट दिल्यानतंरही या वादावर पडदा पडला नसल्याचे संकेत शिवसेनेने दिले होते. पण वैधानिक विकास महामंडळ व सिंचन विकास महामंडळांवर भाजपने शिवसेनेला विश्‍वासात न घेता नियुक्‍त्या जाहीर केल्याने शिवसेनेत संताप आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही शिवसेना सहभागी होण्याचे संकेत नसल्याने भाजपला युतीसाठी मिनतवारी करावी लागत आहे.

चर्चेची दारे उघडण्याचा प्रयत्न
आदेश बांदेकर यांना थेट राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल करत शिवसेनेची नाराजी कमी करून चर्चेची दारे उघडण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते. बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा सर्व शिष्टाचार, मानधन व ट्रस्टच्या कामासाठी प्रवास व निवासी भत्ताही सरकारने निर्णयात नमूद केला आहे.

Web Title: aadesh bandekar state minister politics