'जीएसटी'वरील चर्चेसाठी आदित्य ठाकरे विधिमंडळ गॅलरीत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 21 मे 2017

मुंबई - केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा विधेयकामुळे (जीएसटी) मुंबई महापालिकेचे जकातीचे उत्पन्न संपुष्टात येणार असल्याने शिवसेनेने प्रारंभी "जीएसटी' विधेयकाला विरोध केला होता, मात्र त्यासंबंधात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या आश्‍वासनामुळे राजी झालेल्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आज ही चर्चा ऐकण्यासाठी विधीमंडळात हजर होते. त्यांनी विधानसभेत सुरू असलेली चर्चा आज त्यांनी गॅलरीत बसून ऐकली.

मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे मातोश्री तसेच ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या भाषणाच्या प्रसंगी आदित्य हजर होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरही या वेळी उपस्थित होते. विधान परिषदेतील शिवसेना सदस्य डॉ. नीलम गोऱ्हेही काही काळ त्यांच्या समवेत बसल्या होत्या.