पीकविमा योजनेसाठी आधार अनिवार्य

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मार्च 2017

भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा

भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
मुंबई - खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना व हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. या योजनांसाठी आधार क्रमांक संलग्न केलेल्या बॅंक खात्याच्या वापरामुळे योजनेची अंमलबजावणी जलद होणार आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून खात्यावर थेट जमा करणे सुलभ होणार आहे.

राज्यात खरीप 2016 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या 8 फेब्रुवारी 2017 च्या राजपत्रान्वये खरीप हंगाम 2017 पासून प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणिकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना व फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बॅंकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बॅंकेशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बॅंक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावे लागणार आहे. यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. बॅंक खात्याशी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आदी जोडण्यामुळे बॅंक खात्याशी संलग्न पीक विम्याच्या सेवाही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.

Web Title: agriculture insurance scheme aadhar card mandatory