निरंजन तुला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही! : अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 मे 2018

"नेत्यांनी डावलल्याने व्यथित'
निरंजन डावखरे यांनी विधान भवनात जाऊन सभापतींकडे राजीनामा सोपवला. पत्रकार परिषदेत बोलताना स्थानिक स्तरावरील नेत्यांनी सतत डावलल्याने व्यथित होतो. पक्षाच्या वरिष्ठांना सतत सांगूनही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे मी राजीनामा देऊन भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

मुंबई - 'राष्ट्रवादीत असताना पहिला युवक आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी दिली. युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद दिले; पण आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,'' अशी अगतिकता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार निरंजन डावखरे यांना निरोप देताना व्यक्‍त केली.

विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी "राष्ट्रवादी'ला धक्‍का दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी "राष्ट्रवादी'च्या आमदारकीचा राजीनामा देत भापजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा द्यायला जाण्याअगोदर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. "दादा माफ करा; पण आता स्थानिक राजकारणाला कंटाळलो आहे. मी राजीनामा द्यायला जात आहे,' असे त्यांनी अजित पवार यांना सांगितले.

काहीसे भावुक व नाराज असलेल्या अजित पवार यांनी ""पक्षाने काय कमी केले होते तुला. मतभेद असतील तर इतक्‍या टोकाचा निर्णय का घ्यायला हवा? तुला विधान परिषदेवर संधी दिली. युवक कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केले. राज्यभरात तुला काम करण्याची संधी दिली. तुझ्यासारख्या युवकाचे नेतृत्व राज्यभरात पुढे यावे, हीच पक्षाची भूमिका होती. मात्र, आता सत्ता नाही. त्यामुळे माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही,'' अशा शब्दांत अजित पवार यांनी अगतिकता व्यक्‍त केली.

"नेत्यांनी डावलल्याने व्यथित'
निरंजन डावखरे यांनी विधान भवनात जाऊन सभापतींकडे राजीनामा सोपवला. पत्रकार परिषदेत बोलताना स्थानिक स्तरावरील नेत्यांनी सतत डावलल्याने व्यथित होतो. पक्षाच्या वरिष्ठांना सतत सांगूनही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे मी राजीनामा देऊन भाजपप्रवेशाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Ajit Pawar talked about Niranjan Davkhare