मराठीवर असणारा संस्कृतचा अतिरेकी प्रभाव झुगारा

मराठीवर असणारा संस्कृतचा अतिरेकी प्रभाव झुगारा

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - ""टोकाची वंश-वर्णशुद्धतेची कल्पना जशी कालबाह्य झाली आहे, तशीच संपूर्ण भाषाशुद्धीची कल्पनाही कालबाह्य झाली आहे. मराठीवर असणारा संस्कृत भाषेचा अतिरेकी प्रभाव कमी करून अशा शब्दांऐवजी हिंदी, उर्दू, फार्सी इत्यादी भाषेतून मराठीत आलेले आणि रुळलेले शब्दच अधिक योग्य ठरतील,'' असे प्रतिपादन 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी आज येथे केले.

विस्मृतीत गेलेली शब्दसंपत्ती पुन्हा वापरात आणण्याची अत्यंत आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक उत्तम शब्द आणि वाक्‍प्रचारांची अवस्था लग्नानंतर कधीच वापरल्या न गेलेल्या, ट्रंकेच्या तळाशी पडून राहिलेल्या भरजरी शालूसारखी झाली आहे, असे ते म्हणाले. मराठी ज्ञानभाषा झालीच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले; मात्र त्यासाठी बहुजन समाजाला धसका बसेल असे शब्दप्रयोग वापरण्यापेक्षा त्याच्या किमान परिचयाचे शब्द, मग ते कोणत्याही भाषेतून आलेले असले तरी वापरायला हवेत, असे त्यांनी सांगितले. आपली भाषा समृद्ध करण्याकरता दुसऱ्या भाषेचा दुस्वास करण्याची गरज नाही. इंग्रजी भाषेचे पाय न तोडता आपल्याला मराठीची उंची वाढवता येणार नाही का, असा सवालही त्यांनी केला. मराठीचे भवितव्य आपल्याच मनाच्या जागरूकतेत आणि आपल्या उत्स्फूर्त कृतीपूर्णतेत आहे, याची उपस्थितांना जाणीव करून देत त्यांनी आपल्या मनोगताचा शेवट केला.

मुख्यमंत्र्यांचा निषेध
सत्तावीस गावे कल्याण- डोंबिवली महापालिकेतून त्वरित वगळावीत, या आग्रही मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी येताना राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे काळे निषेधाचे फलक दाखवून व जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.

राजकीय नेत्यांची पाठ
संमेलनाच्या पहिल्या दिवशीच्या नियोजित कार्यक्रमांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख होता; मात्र या साऱ्यांनीच संमेलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान असल्याने सर्व नेते त्यात गुंतले होते.

संमेलनात विक्रमी ग्रंथ विक्री व्हावी यासाठी शहरातील एक लाख विद्यार्थ्यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी येथील ग्रंथ दालनातून किमान एका तरी पुस्तकाची खरेदी करावी, असे आवाहनही या विद्यार्थ्यांना केले आहे. संमेलनात प्रथमच गझल कट्टा तसेच बोलीभाषांना स्थान दिले आहे.
- स्वागताध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com