युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल

युतीसाठी मुख्यमंत्री अनुकूल

मुंबई - राज्यातील दहा महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांत निवडणुकांना सामोरे जाताना शिवसेनेशी युती कररण्याबाबत स्थानिक पदाधिकारी निर्णय घेणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणच्या भाजप मंत्र्यांनी शिवसेनेशी संपर्क करून युतीची शक्‍यता प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मनात भाजपबद्दल कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, असे धोरण स्पष्ट केले आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील 17 जिल्हा परिषदांत भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच सात ते दहा ठिकाणी शिवसेना तसेच अन्य समविचारी पक्षांशी हातमिळवणी केल्यास विजय शक्‍य असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. भाजपचे सर्व प्रमुख मंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मुंबई महापालिकेबद्दल मात्र कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. मुंबईचा विषय उभय पक्षातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अत्यंत संवेदनशील झाला असून, यासंबंधीची चर्चा अत्युच्च पातळीवर होईल, असे सांगण्यात येत आहे.

नगरपालिकांच्या मतदानापूर्वी फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली होती. पक्ष विजयी झाला नाही तर पद सोडावे लागेल, असा दिल्लीचा सांगावा आहे. तो माझ्यासकट सर्वांना लागू होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांना विजयासाठीच लढण्याची साद घातली होती. हा सांगावा कमालीचा यशस्वी झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांना सामोरे जाण्यासाठी ही पूर्वतयारीची बैठक झाली. विदर्भ आणि खानदेश परिसरातील सध्या जिंकलेल्या सर्व जिल्हा परिषदा भाजप राखू शकेल असा अहवाल असून, यवतमाळ, अमरावती आणि कोल्हापूरसह अन्य तीन जिल्हा परिषदाही भाजपला जिंकता येतील, असा अहवाल आहे. सातारा, सांगली अशा काही ठिकाणी भाजप हा नव्या सत्तासमीकरणातला निर्णायक घटक ठरेल, असेही भाकीत आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल लक्षात घेता शिवसेनेला बरोबर ठेवणे सध्या सरकार चालवण्यासाठी आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मानतात. त्यामुळे सहकारी पक्षाला समवेत घेऊन जाण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. युती होणार नसल्यास कटुता टाळणे आणि भाजपने युतीसाठी प्रयत्न केल्याचे लक्षात आणून देणे, हे मुख्यमंत्र्यांचे धोरण असल्याचे सांगण्यात येते.

मुंबईचा निर्णय नंतर
दरम्यान, शिवसेनेने जाहीररीत्या सतत केलेली टीका लक्षात घेता; त्यांना समवेत घेऊ नये, असे मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचे तसेच दिल्लीतील श्रेष्ठींचे मत असल्याचे सांगण्यात येते. या संवेदनील विषयाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री सर्व संबंधितांशी चर्चा करून घेतील. या विषयी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी स्वत: संपर्क करणार असल्याचे सांगण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com