युतीच्या प्रयत्नांना सर्वेक्षणाची "खीळ'

संजय मिस्कीन
शनिवार, 21 जानेवारी 2017

गोपनीय अहवालात भाजपला मुंबईत 90-100 जागांचा दावा

गोपनीय अहवालात भाजपला मुंबईत 90-100 जागांचा दावा
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत शिवसेनेच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपच्या स्वबळाच्या क्षमतेवर मात्र संशयाची सुई कायम होती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही खासगी व सरकारी संस्थांकडून केलेल्या गोपनीय सर्वेक्षणात भाजपला "अच्छे दिन' असल्याचे समोर आल्याने युती करण्याच्या प्रयत्नांना "खीळ' बसण्याचे संकेत आहेत. भाजपला किमान 90-100 जागा मिळतील, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

शिवसेनेसोबत युती नको, असा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सूर कायम असला, तरी मुख्यमंत्री मात्र स्वबळाचा निर्णय आत्मघातकी होणार नाही याची चाचपणी करत होते. युतीच्या निर्णयाची व जागावाटपाच्या सूत्राची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतल्याचे चित्र होते. पण, दोन दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून करण्यात आलेल्या गोपनीय अहवालात भाजपला कौल मिळाल्याने मुख्यमंत्र्यांची युतीबाबत चलबिचल सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले.

मुंबईतल्या सर्वच प्रभागांतून हे गोपनीय सर्वेक्षण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या सर्वेक्षणाची माहिती भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांनाही नव्हती. भाजपने पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना व भाजपला समान संधी असल्याचा कौल मिळाला असला, तरी मुख्यमंत्र्यांकडे उपलब्ध झालेल्या सर्वेक्षणात भाजपला किमान 90 ते 100 इतक्‍या जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. अत्यंत प्रभावी व वस्तुनिष्ठ स्वरूपात हे सर्वेक्षण केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, युतीच्या बाबतीत कायम सकारात्मक असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आता स्वबळाचे धाडस करावे की कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याचे सूत्रांचे मत आहे.

भाजपचे 'एकला चलो रे' शक्‍य
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे 114 जागांची मागणी केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला 227 प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादीदेखील तयार केली आहे. या दोन्ही पर्यायांवर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असून, दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी ते लवकरच चर्चा करण्याची शक्‍यताही सूत्रांनी व्यक्‍त केली. मुंबईत भाजपने स्वबळावरच जावे, या पदाधिकाऱ्यांच्या मताशी मुख्यमंत्रीदेखील या गोपनीय सर्वेक्षणानंतर सहमत होण्याची शक्‍यता असल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. त्यामुळे, आगामी दोन दिवसांत युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळून भाजप "एकला चलो रे'ची भूमिका घेईल, असा विश्‍वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

महाराष्ट्र

पुणे : "बाई तू आम्हास्नी दारूबंदी कशी करायची ह्ये मोबाईलवर दाखवलं. आम्हास्नी त्ये समद समजलं, आता आम्हास्नी आमच्या गावात दारूबंदी...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017