स्त्रीभ्रूण हत्याविरोधी मोहिमेसाठी अमिताभ ब्रॅंड अँबेसिडर?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅंड अँबेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे दिली.

मुंबई - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅंड अँबेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे दिली.

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूण हत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्त्रीभ्रूण हत्या विरोधी राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार भारती लव्हेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. डॉ. सावंत म्हणाले, ""राज्यात मुलींचा जन्मदर काही जिल्ह्यांमध्ये वाढत असून राज्यात सर्वाधिक जन्मदर हा भंडारा जिल्ह्याचा आहे, ही दिलासादायक बाब असून 2015 च्या तुलनेत 78 अंकांनी मुलींचा जन्मदर वाढला आहे, तर सर्वांत कमी जन्मदर वाशीम जिल्ह्याचा आहे, ही मात्र चिंताजनक बाब आहे.

प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने कठोर पावले यापूर्वीच उचलली आहेत. राज्याच्या सीमेलगत अन्य राज्यांचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जाते आणि महाराष्ट्रात येऊन गर्भपात केला जातो. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांना पत्र लिहून आवश्‍यक ती उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, असेही ते म्हणाले

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसेच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सामाजिक प्रबोधन आवश्‍यक असून, त्या माध्यमातून जाणीवजागृती व समाज मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रबोधनाची ही चळवळ प्रभावशाली होण्याकरिता या मोहिमेचे ब्रॅंड अँबेसिडर होण्याकरिता प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना विनंती करण्यात येणार आहे. बच्चन हे राज्य सरकारच्या वन विभाग तसेच क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेचे ब्रॅंड अँबेसिडर म्हणून काम पाहतात, असे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.